‘लापता लेडीज’ ऑस्कर शर्यतीतून आऊट, टॉप 15 मध्येही नाही मिळाले स्थान

दिग्दर्शक किरण रावचा बहुचर्चित चित्रपट लापता लेडिजला ऑस्कर 2025 साठी नामांकन मिळालं होत. यासाठी या चित्रपटाच्या नावात बदल करून लॉस्ट लेडीज असे नावे देण्यात आले होते. मात्र, आता हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतूनच बाहेर पडला आहे. अगदी छोट्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणि ओटीटीवर मोठी कमाई केली होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

दिग्दर्शक किरण रावचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट या वर्षी मार्चमध्ये चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा चित्रपट 1 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. यावेळी प्रेक्षकांकडून या चित्रपटला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट 5 कोटींपेक्षा कमी बजेटमध्ये बनवला होता. मात्र या चित्रपटाने तब्बल 25 कोटींहून अधिक कमाई केली आहे.त्यामुळे या चित्रपटाची ऑस्कर 2025 मध्ये वर्णी लागली होती.

चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘द फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने याबाबत घोषणा केली होती. हिंदुस्थानी फिल्म फेडरेशनच्या समितीनं 29 चित्रपटांच्या यादीतून ‘लापता लेडीज’ची ऑस्कर 2025 साठी अधिकृत निवड केली आहे. या शर्यतीत फिट होण्यासाठी या चित्रपटाचे नाव बदलून लॉस्ट लेडीज असे नवे नाव देण्यात आले होते. मात्र आता या चित्रपटाला टॉप 15 चित्रपटाच्या यादीतही जागा मिळालेली नाही.

दरम्यान आता ब्रिटिश-भारतीय चित्रपट निर्मात्या संध्या सुरी दिग्दर्शित ‘संतोष’ या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाली आहे. ‘संतोष’मध्ये शहाना गोस्वामी आणि सुनीता राजवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच लेख- दिग्दर्शक ॲडम जे. ग्रेव्हज आणि सुचित्रा मिताई यांच्या ‘अनुजा’ चित्रपटाची ऑस्करसाठी शेवटच्या 15 चित्रपटांच्या यादीत निवड झाली आहे. मात्र प्रेक्षकांचा आवडता चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी दिसत आहे.