दिग्दर्शक किरण रावचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट या वर्षी मार्चमध्ये चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. दरम्यान ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्कर 2025 मध्ये अधिकृतपणे दाखल झाला आहे. चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘द फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने ही घोषणा केली आहे. या वर्षात रिलीज झालेल्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांना मागे टाकत लापता लेडीजने ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळवले आहे.
कॉमेडीसह समाजातील महिलांच्या अस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा चित्रपट या वर्षातील फेव्हरेट चित्रपट ठरला. हा चित्रपट पाहून अनेक चाहत्यांनी या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवण्याची मागणी केली होती. प्रेक्षकांचे हे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. हिंदुस्थानी फिल्म फेडरेशनच्या समितीनं 29 चित्रपटांच्या यादीतून ‘लापता लेडीज’ची ऑस्कर 2025 साठी अधिकृत निवड केली आहे.
‘लापता लेडीज’ या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकित करण्यासाठी हिंदुस्थानकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जात ॲनिमल, हनुमान, कल्की 2898 AD , महाराजा, जोरम, श्रीकांत, मैदान, सॅम बहादूर, आदुजीविथम, आर्टिकल 370 अशा एकूण 29 चित्रपटांचा समावेश होता. या 29 चित्रपटांच्या यादीतून ‘लापता लेडीज’ची ऑस्कर 2025 साठी निवड करण्यात आली. तसेच 97 व्या अकादमी पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे.
‘लापता लेडीज’ हा आमिर खानच्या प्रोडक्शनमध्ये बनलेला असून त्याचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले. चित्रपट गृहात हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी 2023 मध्ये टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला. यावेळी प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर हा चित्रपट 1 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. यावेळी प्रेक्षकांकडून या चित्रपटला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट 5 कोटींपेक्षा कमी बजेटमध्ये बनवला होता. मात्र या चित्रपटाने तब्बल 25 कोटींहून अधिक कमाई केली आहे.