आता रेशन दुकानात जाण्याचे टेन्शन नाही , ‘मेरा ई-केवायसी अॅप’द्वारे घरीच करता येणार केवायसी

शासनाने शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशिनद्वारे मोफत केवायसी केले जात आहे. परंतु, लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटांचे ठसे आणि डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहेत. या पाश्र्वभूमीवर शासनाने मेरा ई-केवायसी अॅप कार्यरत केले आहे. आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे केवायसी पूर्ण करता येणार आहे.

जिल्ह्यातील 1हजार 887 स्वस्त धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. शासनाने योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची खात्री करण्यासाठी शिधापत्रिकेतील व्यक्ती आणि आधार क्रमांक रेशनकार्ड सोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिनवर उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 65.73 टक्के केवायसी पूर्ण झाली आहे.

उर्वरित लाभार्थ्यांचे केवायसी झाले नाही, तर धान्य बंद होणार आहे. जिल्ह्यात 29 लाख 67 हजार 583 अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी आहेत. यातील 9 लाख 86 हजार 762 लाभार्थ्यांचे केवायसी बाकी आहेत, तर 19 लाख 50 हजार 662 जणांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. दरम्यान, ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने स्वतंत्र अॅप आणले आहे.

अॅप असे करा डाऊनलोड

■ यात गुगल प्ले स्टोअरमध्ये ‘आधार फेस आरडी’ अॅप शोधा. यानंतर ‘मेरा केवायसी अॅप’ डाउनलोड करा. अॅप उघडल्यानंतर राज्य निवडा आणि ठिकाण टाका. आधार क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी येईल. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी भरा. ही माहिती भरल्यानंतर सबमिट करा. यावेळी मोबाईल स्क्रीनवर दिसणारी माहिती व्हेरिफाईड करा आणि क्सेप्ट बटणावर क्लिक करा. फेस ई-केवायसीवर क्लिक करा. सेल्फी कॅमेरा उघडल्यावर डोळे बंद करा आणि उघडा, फोटो कॅप्चर होताच ई-केवायसी पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगितले.