कुर्लावासीयांचा मिंधे, अदानीला दणका; मदर डेअरीच्या जमीन मोजणीला स्थगिती, महाविकास आघाडीच्या उग्र आंदोलनाला यश

कुर्ला येथील मदर डेअरीच्या जागेची प्रशासनाकडून होणाऱ्या जमीन मोजणी विरोधात महाविकास आघाडीने आज सकाळी केलेल्या तीव्र आंदोलनाने प्रशासनाचे धाबे दणाणले आणि प्रशासनाने तत्काळ डेअरीच्या जमीन मोजणाची नाद सोडून देत मोजणीला स्थगिती दिली. मिंधे, भाजप, अदानी समुहाविरोधात ‘अदानी हटाव, मुंबई बचाव’ अशा जोरदार घोषणांनी कुर्ला परिसर दणाणून गेला. सुभाष शहा चौक, नेहरूनगर परिसरात झालेल्या आंदोलनात महाविकास आघाडीतील पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था तसेच कुर्ल्याचे रहिवासी सहभागी झाले होते.

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी  कुर्ल्यातील राज्य सरकारच्या ताब्यात असलेली मदर डेरीची 21 एकरची जागा अदानी समूहाला देण्याचा निर्णय मिंधे सरकारने घेतला आहे. आज झालेल्या आंदोलनावेळी विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर, शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने, विधानसभा संघटक दिलीप शिंदे, उपविभागप्रमुख संदीप गावडे, नंदू जाधव, शिवसेनेचे मनीष मोरजकर, माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर, संजना मुणगेकर,  विठ्ठल पवार, अॅड. राजू कोरडे, अॅड. संदीप कटके, अनिल कासारे, आपचे राफेल पॉल, किरण पेहलवान, मिलिंद कांबळे, सुभाष भालेराव उपस्थित होते.