नोकरीच्या पहिल्या दिवशी आयुष्याचा शेवट, कामावर गेलेली लेक परतलीच नाही

19 वर्षांच्या आफरिन शहा हिच्या नोकरीचा पहिला दिवस. डोळय़ांत अनेक स्वप्नं घेऊन आफरिन कामाला घाटकोपरला गेली. ऑफिस सुटल्यावर ती कुर्ला स्टेशनला उतरली. घरी जाण्यासाठी चालत निघाली, मात्र ती घरी पोहोचलीच नाही. काळाने घाला घातला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. बेस्ट बसने धडक दिल्याने आफरिन जागीच ठार झाली. नोकरीचा पहिला दिवस तिच्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला… हे सांगताना आफरिनच्या पित्याने टाहो फोडला.

आफरिनचे वडील अब्दुल सलीम शाह यांनी लेकीसोबत शेवटचं काय बोलणं झालं ते सांगितलं. अब्दुल शाह म्हणाले, आफरिनने मला 9 वाजून 9 मिनिटांनी कॉल केला. मला सांगितलं की शिवाजीनगरला जायला रिक्षा मिळत नाही. मी तिला हायवेला जाऊन रिक्षा पकडायला सांगितलं. मात्र 9.54 मिनिटांनी मला माझ्या मुलीच्या नंबरवरून कॉल आला. हा कॉल भाभा रुग्णालयाच्या स्टाफने केला होता. आम्ही तत्काळ रुग्णालयात पोहोचलो. आफरिनच्या डोक्यावर, चेहऱयावर गंभीर जखमा झाल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला.

मंगळवारी दुपारी भाभा रुग्णालयातून तिचा मृतदेह घरी नेण्यात आला. कुर्ल्याची अल्ताफ सोसायटी सुन्न झाली. मुलीचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला. त्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. पहिल्या दिवशी उत्साहाने कामाला गेलेली त्यांची लेक घरी येण्याऐवजी तिचा निष्प्राण देह घरी आला. शेजारी आफरीनच्या कुटुंबाला धीर देत होते. सायंकाळी तिच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले.

आम्हाला न्याय द्या

या घटनेबद्दल आफरिनच्या वडिलांनी संताप व्यक्त केला. वर्षानुवर्षे परिस्थिती बदलली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत पार्किंग असते. फेरीवाल्यांनी फुटपाथ अडवलेले असतात. लोकांना चालायला फुटपाथवर जागा नाही. चालायचे कसे, असा संतप्त सवाल त्यांनी केला. आम्हाला न्याय द्या, असे ते म्हणाले.

भूक लागली म्हणून शिवम रोडवर आला

माटुंग्यातील खालसा कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला असलेला शिवम कश्यम (18) धारावीत राहायला होता. कॉलेजमधून आल्यावर कुर्ला येथील एलबीएस मार्गावर वडिलांच्या कपड्याच्या दुकानात तो मदतीला जात असे. सोमवारी तो कॉलेजमधून सुटल्यावर घरी गेला आणि नेहमीप्रमाणे वडिलांना दुकानात मदत करण्यासाठी निघाला. एलबीएस मार्गावर आल्यावर भूक लागली म्हणून तो मेन रोडवरील स्टॉलवर आला आणि त्याच वेळी बसने त्याला चिरडले. गंभीर जखमी झालेल्या शिवमला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पालक आणि दोन लहान भाऊ आहेत.

नेहमीच्या रस्त्याने घेतला कनिझ यांचा बळी

कुर्ला पश्चिममधील देसाई रुग्णालयात आया म्हणून काम करणाऱया कनिझ अन्सारी नेहमीप्रमाणे काम संपवून घरी येत होत्या. त्या एलबीएस मार्गावर आल्या आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी डायल केलेल्या शेवटच्या नंबरवर फोन केला असता त्यांच्या लहान मुलाने फोन उचलला आणि या अपघातात आईचा मृत्यू झाल्याची बातमी अन्सारी कुटुंबीयांना कळली. अन्सारी यांचा मोठा मुलगा अब्बास सांगतो, ‘काम संपवून घरी येण्याचा आईचा हा नेहमीचा रस्ता होता. हा रस्ता दिवसेंदिवस दाटीवाटीचा आणि जास्त रहदारीचा झाला असल्याची तक्रार आई नेहमी करत असे. या रस्त्यावरून चालायचे कसे, चालायला जागा शिल्लक राहिलेली नाही म्हणायची. शेवटी याच रस्त्याने तिचा बळी घेतला.’

फातिमा यांचे दागिने लंपास

कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेत कनिस फातिमा गुलाम कादरी अन्सारी (64) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बसच्या धडकेत जखमी झाल्याने त्यांना भाभा इस्पितळात नेले होते. अपघात झाला तेव्हा त्यांच्या कानात सोन्याचे इअररिंग्स व हातात बांगडी होती. पण ते सर्व गायब असल्याचे आम्हाला इस्पितळात आढळून आले. या बाबत पोलीस आणि इस्पितळाच्या अधिष्ठातांना सांगितले आहे. पण ते दागिने अद्याप मिळाले नसल्याचे त्यांचा मुलगा अबिदने सांगितले.

राजावाडीत शिवसैनिकांचे रात्रभर मदतकार्य

काही जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे शिवसैनिकांनी रात्रभर मदतकार्य केले. नातेवाईकांना मदत करण्याबरोबरच त्यांना धीर दिला जात होता. यंत्रणांना सहाय्य करून नातेवाईक आणि यंत्रणांमधील दुवा बनण्याचे काम शिवसैनिकांनी केले. शिवसेना ईशान्य मुंबई विभागप्रमुख सुरेश पाटील, उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, शिव आरोग्य सेना मुंबई जिल्हा सहसमन्वयक आणि डोंबिवली विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, आरोग्य सेना संघटक सचिन भांगे यांच्याबरोबर असंख्य शिवसैनिकांचा मोलाचा सहभाग होता.