
कुर्ला बस अपघातातील आरोपी चालकाला मुंबई सत्र न्यायालयाने आज दणका दिला. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून यात नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अर्जदाराची सुटका करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी आरोपी चालक संजय मोरेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
कुर्ला येथे 9 डिसेंबर रोजी बेस्टच्या एसी बसने वाहनास व तेथील काही नागरिकांना धडक दिली. या अपघातात 9 जणांचा बळी गेला तर 42 जण जखमी झाले. याप्रकरणी बस चालक संजय मोरे याच्या विरोधात बेदरकार वाहन चालवल्या प्रकरणी व निष्पाप लोकांचा बळी घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली. दंडाधिकारी न्यायालयाने जामीन फेटाळून लावत कोठडीची शिक्षा सुनावताच चालक संजय मोरे याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. पाठारे यांनी त्याचा जामीन अर्ज 10 जानेवारी रोजी फेटाळून लावला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. आपल्याला यात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले असून अपघात दुर्दैवाने घडला तसेच आणखी कोठडीची आवश्यकता नाही त्यामुळे न्यायालयाने जामीन द्यावा अशी मागणी करत मोरे याने दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने त्याचा हा अर्जसुद्धा फेटाळून लावला.