बेजबाबदारपणे बस चालवल्यानेच निष्पाप लोकांचा बळी गेला! चालक संजय मोरेच्या जामिनाला सरकारचा विरोध

कुर्ला बेस्ट बस अपघातप्रकरणी सुटकेसाठी सत्र न्यायालयात धाव घेणाऱया चालक संजय मोरेच्या जामीन अर्जाला राज्य सरकारने आज जोरदार विरोध केला. संजय मोरे याने बेजबाबदारपणे गाडी चालवल्यामुळेच निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या अपघातामागे काही हेतू होता का, या दिशेने पोलीस तपास करत असून आरोपी चालक मोरेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावावा अशी मागणी राज्य सरकारने न्यायालयाला केली.

कुर्ला येथे 9 डिसेंबर रोजी बेस्टच्या एसी बसने वाहनास व तेथील काही नागरिकांना धडक दिली. या अपघातात 9 जणांचा बळी गेला तर 42 जण जखमी झाले. याप्रकरणी बसचालक संजय मोरे याच्या विरोधात बेदरकार वाहन चालवल्याप्रकरणी व निष्पाप लोकांचा बळी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली. दंडाधिकारी न्यायालयाने जामीन फेटाळून लावत कोठडीची शिक्षा सुनावताच चालक मोरे याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अॅड. समाधान सुलाने यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. त्या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. पाठारे यांच्यासमोर आज शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सरकारी वकिलांनी मोरेच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. या अपघाताला आरोपी चालक संजय मोरे हाच जबाबदार असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याने त्याला जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत जामीन अर्जावरील निकाल 10 जानेवारीपर्यंत राखून ठेवला.

इतरांविरोधात गुन्हे का नाहीत?

चालक संजय मोरे यांच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. समाधान सुलाने यांनी सांगितले की, याप्रकरणी मोरे यांना बळीचा बकरा बनवला जात आहे. अपघातप्रकरणी डेपो मॅनेजर, प्रशिक्षण देणारे कर्मचारी तसेच ज्या कंपनीची बस आहे ते मालक यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा का नाही दाखल केला? चालक मोरे यांनाच टार्गेट केले जात असून त्यांच्यावर खापर फोडले जात आहे.