चालक संजय मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाईल! पोलिसांचा न्यायालयात दावा

कुर्ला येथील बेस्ट बस अपघातप्रकरणी अटक केलेल्या चालक संजय मोरेच्या जामीन अर्जाला गुरुवारी पोलिसांनी तीव्र विरोध केला. आरोपी संजय मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाईल, असा दावा पोलिसांनी सत्र न्यायालयात केला. न्यायालय याबाबत शनिवारी सविस्तर सुनावणी घेणार आहे.

9 डिसेंबरला भरधाव बेस्टच्या एसी बसने अनेक पादचाऱयांना चिरडले होते आणि कित्येक वाहनांना धडक दिली होती. या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर 42 जण जखमी झाले होते. याप्रकरणी बसचालक संजय मोरे याला बेदरकार ड्रायव्हिंग केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून कुर्ला दंडाधिकारी न्यायालयाने त्याला जामीन नाकारून कोठडी सुनावली होती. त्यानंतर मोरेने अॅड. समाधान सुलाने यांच्यामार्फत सत्र न्यायालयात दाद मागितली होती. त्याच्या जामीन अर्जावर गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. पाताडे यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी कुर्ला पोलिसांतर्फे सरकारी वकील प्रभाकर तरांगे यांनी मोरेच्या जामीन अर्जाला विरोध केला.

बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता!

अपघात झालेल्या बेस्टच्या बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता, असाही दावा पोलिसांनी आरटीओच्या अहवालाचा संदर्भ देत केला आहे. अपघात घडला त्यावेळी तिथे हजर असलेल्या 40 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. आरोपी मोरेने ड्रायव्हिंग करताना मद्यप्राशन केले नव्हते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालात तसा निष्कर्ष काढण्यात आला आहे, असेही पोलिसांनी आपल्या उत्तरामध्ये म्हटले आहे.