
कुर्ला पश्चिमेला भीषण अपघात करणारा बेस्ट बस चालक संजय मोरे याची पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्याला कुर्ला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. मोरेने केलेल्या या अपघातात नऊ जणांचा नाहक जीव गेला होता.
कुर्ला पश्चिमेकडील एस. जी. बर्वे मार्गावर 9 डिसेंबरच्या रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास 332 क्रमांकाच्या बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. चालक संजय मोरे याने हयगयीने व बेदरकारपणे बस चालवत 21 वाहनांना धडक देत 40 हून अधिक नागरिकांना चिरडले होते. काळजाचा थरकाप उडविणाऱया या अपघाताला जबाबदार असलेल्या चालक संजय मोरे याला कुर्ला पोलिसांनी कुर्ला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी 51 वे न्यायालयात हजर केले होते. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीचा असा गुन्हा करण्याचा हेतू होता का, हा कुठला कट होता का, त्यात अजून कोणी सहभागी आहे का, अपघात झाला तेव्हा चालकाने अमली पदार्थाचे सेवन केले होते याचा तपास होणे बाकी असल्याने त्याची सात दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली होती. पण न्यायालयाने मोरेला 11 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. शनिवारी मोरेच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.