Kurla bus accident: नवीन नोकरीचा पहिला दिवस आटपून घरी परतत होती आफरीन, वडिलांना घ्यायला बोलावले त्याआधीच…

कुर्ला येथे सोमवारी रात्री भरधाव बसने अनेक गाड्या व रस्त्यावर चालणाऱ्यांना उडवले. या भयंकर घटनेत 43 जण जखमी झाले असून 6 जणांचा मृत्यू झाला. जखमींवर कुर्ला शीव येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भयंकर घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे.

या अपघातात 19 वर्षीय आफरीन शाह या तरुणीचा देखील मृत्यू झाला आहे. डोळ्यात मोठ मोठी स्वप्न घेऊन आफरीन ही तिच्या आयुष्यातील पहिल्या नोकरीचा पहिला दिवस आटपून घरी परतत होती. मात्र त्यावेळी तिला माहित नव्हतं की तिच्या नोकरीचा पहिला दिवस हा तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरणार होता. घरी परतत असताना आफरिनने तिचे वडिल अब्दुल सलीम यांना घ्यायला बोलावले होते. त्यावेळी सलीम यांनी तिला कुर्ला स्थानकातून चालत थोडं पुढे ये असे सांगितले. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे आफरिन कुर्लास्थानकाबाहेरून चालत निघाली. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव बसने तिला उडवले. आफ्रिनला तत्काळ भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच तिचा मृत्यू झाला होता.

आफ्रिनचे वडील जे तिला घरी परत आणायला निघाले होते त्यांना मुलीचा मृतदेह घ्यायला रुग्णालयात जावे लागले. आफ्रिनच्या वडिलांनी या प्रकरणातील आरोपी बस चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.