Kurla bus accident: इथे माणूसकीही ओशाळली, महिलेच्या मृतदेहावरून कानातले चोरले

कुर्ला स्थानकाबाहेर बेस्ट बसमुळे झालेल्या भयंकर अपघातात कनिस फातिमा या महिलेचा मृत्यू झाला. दास रुग्णालयात नर्स असलेल्या कनिस या रात्रपाळीला जात असताना बसने त्यांना उडवले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर त्यांचा मुलगा आबीद याने प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याच्या आईच्या मृतदेहावरील कानातले चोरल्याचा आरोप केला आहे.

”नऊ वाजता माझी आई आमच्याशी गप्पा वगैरे मारून घरातून कामाला निघाली. अर्ध्या तासात मला एक निनावी कॉल आला की तुमच्या आईचा अपघात झाला. लगेचच आम्ही तिथे पोहोचलो. तिथे गेल्यावर पाहिलं तर माझी आई बस आणि कारच्या मध्ये अडकली होती. तिचा जागीच मृत्यू झाला. जेव्हा मी आईला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तिच्या गळ्यात चेन, कानात कानातले व हातात बांगड्या होत्या. त्यानंतर माझ्या आईला रुग्णालयात नेण्यात आले. अर्ध्या तासानंतर मी जेव्हा पुन्हा आईला पाहिले तर तिचे कानातले अंगावर नव्हते. प्रशासनाने चेन बांगड्या आम्हाला परत केल्या मात्र कानातले तिच्या अंगावर नव्हते’, असा आरोप आबिदने केला आहे.