आठवडाभरापूर्वी कुर्ला परिसरात घडलेल्या बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या 8 झाली आहे. सोमवारी सकाळी आणखी एका जखमी पादचाऱ्याचा मृत्यू झाला. फजलू रेहमान शेख (52) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू होते. शेख यांनी आठवडाभर मृत्यूशी झुंज दिली. ते घाटकोपर परिसरातील रहिवाशी आहेत.
गेल्या सोमवारी रात्री कुर्ला पश्चिम परिसरात महापालिकेच्या एल विभाग कार्यालयासमोर बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. कमी प्रशिक्षित चालकाने बेस्टची इलेक्ट्रिक बस भरधाव वेगात चालवली आणि नियंत्रण सुटल्याने बसची अनेक पादचारी आणि वाहनांना जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता, तर 49 जण जखमी झाले होते. त्या जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
पालिकेच्या शीव रुग्णालयात उपचार घेणाऱ्या फजलू रेहमान शेख यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या 8 झाली आहे. आणखी काही जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत. काही जखमींवर कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा व शीव रुग्णालयात उपचार केले जात आहेत.