कुर्ला दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग, बेस्टच्या भाडेतत्त्वावरील ड्रायव्हरना वाढीव प्रशिक्षण, परवान्यांचीही तपासणी होणार!

कुर्ल्याच्या एलबीएस रोडवर सोमवारी रात्री भरधाव ‘बेस्ट’ बसने 50 जणांना चिरडल्याने सात जणांचा बळी गेल्यामुळे प्रशासन आता खडबडून जागे झाले असून, आता भाडेतत्त्वावरील ड्रायव्हरना वाढीव प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्या परवान्यांची तपासणी होणार आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर तातडीने याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात 50 जण जखमीही झाले आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी बेस्ट प्रशासनाने समितीही नेमली आहे. ही समिती दोन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. यानंतर सुरक्षित ड्रायव्हिंगबाबत परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. ‘बेस्ट’च्या ताफ्यात स्वतःच्या एक हजार, तर भाडेतत्त्वावरील 2200 गाडय़ा आहेत. या बसवर ड्रायव्हिंग करताना दहा दिवसांचे ट्रेनिंग देण्यात येते. अपघात टाळण्यासाठी हे ट्रेनिंग वाढवण्याची गरज आहे का, याबाबत पुनर्विचार करून आवश्यकता असल्यास प्रशिक्षण काळ वाढवण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ड्रायव्हरना सौजन्य, मानसिक स्थैर्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

…म्हणूनच घेतला निर्णय

बेस्टच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील गाडय़ांवर कंत्राटदाराचा ड्रायव्हर असतो, तर प्रवाशांना स्टॉपवर आणि काही बसमध्ये तिकीट देण्यासाठी पंडक्टर असतो. हा कंडक्टर बेस्ट प्रशासनाचा असतो. त्यामुळे भाडेतत्त्वावरील कंत्राटदाराकडून पुरवण्यात येणाऱ्या बस आणि ड्रायव्हरबाबत खबरदारी घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बेस्ट प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कुर्ल्यात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई

कुर्ला डेपोमधून बस बाहेर पडल्यानंतर फक्त 500 मीटर अंतर गेल्यावर ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे ही भरधाव बस तब्बल 300 मीटर अनेक गाड्या, पादचाऱ्यांना चिरडत भल्यामोठय़ा खांबाला धडकल्याने थांबली. या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा दुकाने-फेरीवाले असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पालिकेकडून मंगळवारपासूनच या भागात बेकायदा दुकानदार-फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

चेहऱ्यावर भीती अन् बाहेर पडण्याची धडपड… बस अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर

कुर्ला बस अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. भरधाव बस रस्त्यावरील अनेकांना चिरडत असताना आतील प्रवाशांची काय अवस्था होती, ते सीसीटीव्ही फुटेजमधून पाहायला मिळतेय. यामध्ये खच्चून भरलेल्या बसमध्ये अनेक प्रवासी उभ्याने प्रवास करताना दिसतायत. बसचा वेग वाढू लागताच प्रवासी प्रचंड घाबरले दिसत आहे. अवघ्या काही सेपंदांमध्ये बसने वाहनांना धडक दिली, अनेकांना चिरडले. यावेळी प्रवाशांच्या चेहऱयावरील भीती आणि बसमधून बाहेर पडण्याची धडपड सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघायला मिळतेय.

दारुड्या कंत्राटी चालकावर कारवाई झालीच नाही

डागा समूह बेस्टला बस गाडय़ांसह कंत्राटी चालक आणि वाहक पुरवण्याचे काम करते. नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मुलुंड आगारातून घाटकोपर पोलीस ठाण्यासाठी डागा ग्रूपच्या काही बस गेल्या होत्या. या बस परत मुलुंड आगारात येत असताना सुरक्षा तपासणी दरम्यान एका बसमधील बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळले. चालकाची कानउघाडणी केल्यावर या सुरक्षा कर्मचाऱ्याने डागा समूहाचे आगार अधिकारी रुपनावर यांना ही घटना सांगितली आणि कारवाईची मागणी केली. रुपनावर यांनीही त्या चालकाला कामावरून काढून टाकले जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, हा कर्मचारी अजूनही त्याच बसवर काम करत असल्याचे आढळला आहे. कंत्राटदार कंपनी आणि आगार अधिकारी मुंबईकरांच्या जिवाशी खेळ करत असून दुर्घटनांना अशा कंपनी, आगार अधिकारी आणि चालक जबाबदार असल्याचा आरोप या सुरक्षा कर्मचाऱ्याने केला आहे.