Kunal Kamra Controversy – कामरावरून विधिमंडळात गदारोळ

स्टॅण्डअप कॉमेडीयन कुणाल कामराच्या बिडंबन गीतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली असल्याचा आरोप करत कामरा याला ताबडतोब अटक करा, अशी मागणी सत्ताधाऱयांनी विधान परिषदेत केली आणि गोंधळ घातला. त्यामुळे परिषदेचे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. त्यात सभागृहाचा सुमारे पाऊण तास वाया गेला तर विधानसभेचे कामकाज एकदा तहकूब करण्यात आले.

विधान परिषदेत दुपारच्या सत्रात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 289 अन्वये सूचना मांडली. ते म्हणाले, उद्या आणि परवा आपण संविधानावर सभागृहात चर्चा करणार आहोत. यात नागरिकांच्या अधिकारांवरही चर्चा करणार आहोत. अंधेरीत काल रात्री एका स्टुडिओवर पोलीस अधिकाऱयांच्या उपस्थितीत हल्ला करण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच तोडपह्ड केली. तोडपह्ड करणाऱया कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात बोलणाऱया प्रशांत कोरटकर, अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात कधीही प्रतिक्रिया दिली नाही. असे असताना एक विडंबन गीत करणाऱया कवीचा स्टुडिओ पोलीस अधिकाऱयांच्या उपस्थितीत तोडला जातो आणि मुख्यमंत्री म्हणतात की, कामरा याने माफी मागितली पाहिजे. राज्य सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेत आहे, असे दानवे म्हणाले.

कुणाल कामराने माफी मागावी – मुख्यमंत्री

संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. स्टॅण्डअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कुणाल कामराच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. कुणाल कामराने या गीताबाबत माफी मागावी, असेही ते म्हणाले. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कामरा यांचे सीडीआर तसेच बँक खाती तपासणार असल्याचे सांगितले.