
स्टॅंडअप कॉमेडिअन कुणाल कामराच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. कुणाल कामराने त्याच्या एका शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबपनर गाणं सादर केलं. हे गाणं प्रचंड व्हायरल झाल्यानंतर शिंदे समर्थकांनी जिथे हा शो शूट झाला होता त्या हॅबिटॅट स्ट्युडीओची तोडफोड केली. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी कुणाला समन्स पाठवले आहेत.
दरम्यान, कुणालने सादर केलेल्या कवितेमुळे त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कुणालविरुद्ध मिळालेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी पुढील चौकशी करण्याचे आदेश खार पोलिसांना दिले होते. आता खार पोलिसांनी कुणालला समन्स पाठवले आहेत.
सध्या कुणाल हा मुंबईत नसल्यामुळे पोलिसांनी कुणालच्या वडिलांकडे कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. याचसोबत कुणालला व्हॉट्सअपद्वारे देखील समन्स पाठवण्यात आले आहेत. याचबरोबर चौकशीसाठी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणी कुणालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोणाचीही माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मी माफी मागणार नाही अशी रोखठोक भूमिका कॉमेडियन कुणाल कामराने मांडली आहे. जे अजित पवार बोलले तेच मी बोललो. तसेच मी जिथे कॉमेडी करतो ती जागा तुम्ही तोडणार असाल तर पुढचा शो मी एलफिन्स्टन ब्रिजवर करेन असेही कामरा म्हणाला आहे.
…तर पुढचा शो एलफिन्स्टन ब्रिजवर करेन, कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार