लोकशाही पद्धतीने कशी करावी कलाकाराची हत्या?कुणाल कामराची नवी पोस्ट

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने मंगळवारी पुन्हा एकदा सत्ताधाऱयांवर जोरदार निशाणा साधला. ‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची?’ अशा शीर्षकाखाली कामराने ‘एक्स’वर ट्विट केले आणि राजकीय शस्त्राने कलाकारांना कशा प्रकारे संपवले जातेय, याचा घटनाक्रमच जाहीर केला. कलाकारांच्या होत असलेल्या मुस्कटदाबीवर त्याने ही पोस्ट केली.

कुणाल कामराने गायलेल्या ‘गद्दार’ गीतामुळे मिंधे गटाची बेअब्रू झाली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मिंधे गटाने धमक्या व कारवाईचे दबावतंत्र अवलंबले आहे. त्यापुढे हार न मानता कामराने सोशल मीडियातून सरकारवर हल्लाबोल सुरू ठेवला आहे. मंगळवारी त्याने कलाकारांच्या मुस्कटदाबीवर भाष्य केले आणि सत्ताधारी मिंधे गटावर पुन्हा निशाणा साधला. सरकारविरोधात बोलणाऱयांना शांत करण्याचा पद्धतशीर कट रचला जातो, असे कामराने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आणि लोकशाही पद्धतीने कलाकाराची कशा प्रकारे हत्या केली जाते, याचा घटनाक्रम जाहीर केला. हे सत्ताधारी सरकारकडून अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा दाबण्यासाठी वापरले जाणारे केवळ एक प्लेबुक नाही तर राजकीय हत्यार आहे, असे परखड मत कामराने ‘एक्स’वरील पोस्टमधून मांडले.

कठपुतळी बनायचं किंवा शांत राहायचं!

सरकारच्या दडपशाहीच्या कारस्थानावर कुणाल कामराने बोट ठेवले. सरकरिने अशी परिस्थिती निर्माण केलीय की कलाकारांकडे केवळ दोन पर्याय उरले आहेत. एकतर आपला आत्मा विकायचा आणि हातची बाहुली (कठपुतळी) बनायचे किंवा दुसरा पर्याय म्हणजे शांत राहून गायब व्हायचे, अशा शब्दांत कामराने सरकारला पुन्हा एकदा चिमटा काढला.

कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का? – हर्षवर्धन सपकाळ

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले असून आता कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांनी कार्यक्रम पाहिला यात त्यांचा काय दोष? कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का?, असा सवाल कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. कामराला धमकी देणारे, स्टुडिओची तोडपह्ड करणारे मोकाट आणि कार्यक्रम पाहणाऱयांना पोलिसांचा जाच हा कसला न्याय? महाराष्ट्राला पोलीस स्टेट बनवण्याचा हा उद्योग त्वरित थांबवावा, असे सपकाळ म्हणाले.

कामराला ट्रांजिट अंतरिम जामीन मंजूर
कुणाल कामराने मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयात हजेरी लावली. अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर होऊनही मुंबई पोलिसांकडून अटक केली जाण्याची भीती कामराने व्यक्त केली आणि ट्रांजिट अंतरिम जामीन मंजूर करण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. त्यावर न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी कामराला वनूर न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. तेथे हजेरी लावल्यानंतर वनूर न्यायालयाने कामराला ट्रांजिट अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळे मुंबई पोलिसांना आता तामिळनाडूमध्ये जाऊन कामराला अटक करता येणार नाही.

कलाकाराला संपवायचे कारस्थान

1 कलाकाराविरुद्ध इतका संताप व्यक्त करा की त्या कलाकाराला कुठलेही ब्रॅण्ड काम देणे बंद करतील.
2 इतक्या प्रमाणात वाद निर्माण करा की त्याचे खासगी आणि कॉर्पोरेट कार्यक्रम बंद होतील.
3 इतका हिंसक प्रतिसाद द्या की मोठे ‘व्हेन्यू’सुद्धा त्याला व्यासपीठ द्यायला घाबरतील.
4 कलाकाराविरुद्ध इतका आक्रोश करा की सर्वात छोटय़ा ठिकाणांवर त्या कलाकारासाठी दरवाजे बंद केले जातील.
5 अशा प्रकारच्या प्रेक्षकांना प्रश्न विचारण्यासाठी बोलवा, जे प्रेक्षक कलेचा मंच ‘क्राईम सीन’ बनवतील.

कामराचा शो पाहणाऱया प्रेक्षकांनाही नोटिसा
पोलिसांनी कामराचा शो पाहणाऱया प्रेक्षकांनाही नोटिसा धाडल्या आहेत. शोबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी प्रेक्षकांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. कुणाल कामराने ‘गद्दार’ गीत गायले त्या दिवशी शोमध्ये नेमके काय घडले, ते गाणे कधी आणि किती वेळा सादर केले, याची माहिती प्रेक्षकांकडून घेतली जात आहे. शोला उपस्थित असणाऱया प्रेक्षकांना कामराने संपर्क कसा साधला, शोचे चित्रीकरण लाइव्ह होते का, प्रेक्षकांना मानधन देऊन शोला बोलावले होते का, याचीही माहिती पोलीस जाणून घेत आहेत.