कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांनी स्नान केलेले त्रिवेणी संगमातील पाणी दूषित, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धक्कादायक अहवाल; नदी स्वच्छतेचे तीनतेरा… भाजपच्या भ्रष्टाचाराने राम तेरी गंगा मैली

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात देशभरातील कोट्यवधी भाविकांनी स्नान केलेले त्रिवेणी संगमातील पाणी अत्यंत दूषित आहे. गंगा-यमुना नदीच्या संगमातील पाणी स्नान करण्यासाठी योग्य नाही. या पाण्यात ‘फेकल कोलीफॉर्म’ बॅक्टेरियाचे प्रमाण प्रचंड वाढले असून हे पाणी आरोग्यासाठी घातक आहे, असा निष्कर्ष केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला आहे. त्रिवेणी संगमातील तब्बल 73 ठिकाणच्या पाण्याचे नमुने दूषित आढळले. याचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादापुढे सादर केला आहे. भाजपच्या भ्रष्टाचारामुळे गंगा नदी स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे.

  महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, आग लागण्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. त्या घटनांनी कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यात पाण्याच्या प्रदूषणकारी पातळीने सरकारी यंत्रणा व भाविकांच्या चिंतेत मोठी वाढ केली आहे. नद्यांच्या पाण्यात ‘फेकल कोलीफॉर्म’ नावाचे सूक्ष्मजंतू आढळतात. एक मिलीलिटर पाण्यात 100 बॅक्टेरिया असतात, परंतु अमृतस्नानाच्या एक दिवस आधी यमुना नदीतून घेतलेल्या पाण्याच्या एका नमुन्यात तब्बल 2300 बॅक्टेरिया आढळले. ‘सीपीसीबी’च्या संशोधन पथकाने गंगा-यमुना संगमावरील अनेक घाटांवरून पाण्याचे नमुने घेतले होते. संगमावर दररोज कोट्यवधी लोक स्नान करीत असल्यामुळे बॅक्टेरियाचे प्रमाण प्रचंड वाढल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. प्रदूषणकारी घटकांचा भाविकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. महाकुंभमेळय़ाचे अजून आठ दिवस बाकी आहेत. दरदिवशी कोट्यवधी भाविकांची भर पडून महाकुंभमधील एकूण भाविक संख्या 60 कोटींच्या पुढे जाऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खबरदारीची ठोस पावले उचलली जाणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सरकारला एका दिवसात  स्पष्टीकरण देण्याचे आदेश

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाची राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत बुधवारी तातडीची सुनावणी निश्चित करत योगी सरकारच्या सचिवांना तसेच उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संगमावरील पाण्याच्या स्वच्छतेसंबंधी कोणती कार्यवाही करण्यात आली, याचा सविस्तर अहवाल लवादाने योगी सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागितला आहे.

संगमावरील अनेक घाटांवर स्नान करताना भाविक ओंजळीत पाणी घेतात. ते पाणी पवित्र मानून प्राशनही करतात. मात्र आता प्रदूषणकारी घटकांच्या वाढीव प्रमाणामुळे सरकार पाणी प्राशन करण्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार का? पाणी शुद्धीकरणासाठी ठोस पावले उचलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

योगी सरकार नियोजनात अपयशी

गंगा-यमुना नद्यांच्या संगम ठिकाणी सांडपाण्याचा प्रवाह रोखण्याबाबत राष्ट्रीय हरित लवाद आधीपासूनच सुनावणी घेत आहे. महाकुंभच्या पार्श्वभूमीवर लवादाने योगी सरकारला सांडपाणी व्यवस्थापनाबाबत निर्देश दिले होते. त्यानंतरही योगी सरकार नियोजनात अपयशी ठरले.

चिंताजनक आकडेवारी

गंगा-यमुना संगमाच्या परिसरातील पाण्याची गुणवत्ता अत्यंत खराब आहे. येथील पाण्याच्या नमुन्यात एक मिलीलिटर पाण्यात 100 ऐवजी 2000 ‘फेकल कोलीफॉर्म’ बॅक्टेरिया आढळले. एकूण सूक्ष्मजंतूचे प्रमाण 4500 हून अधिक आहे.

गंगा नदीवरील शास्त्राr पुलाजवळील परिसरातून घेतलेल्या नमुन्यांत एकूण ‘फेकल कोलीफॉर्म’ बॅक्टेरिया तब्बल 4700 इतके आढळून आले.

संगमापासून दूर असलेल्या फाफामऊ क्रॉसिंग, राजापूर मेहदौरी, झुसी येथील छतनाग घाट, एडीए कॉलनी या भागांतही 800 ते 1000 च्या दरम्यान ‘फेकल कोलीफॉर्म’ बॅक्टेरिया आढळले.

लवादाने दिलेल्या निर्देशांचे योगी सरकारकडून उल्लंघन

भाविकांच्या संगमावरील पाण्याच्या गुणवत्तेची माहिती द्या, असे निर्देश हरित लवादाने योगी सरकारला दिले होते. प्रयागराजमध्ये गंगाजलची पुरेशी उपलब्धता असावी तसेच आंघोळीसाठी व पिण्यासाठी स्वच्छ पाणी असावे, असे लावादाने बजावले होते, मात्र उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने त्या निर्देशांचे सरळसरळ उल्लंघन केले.