उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विरोधकांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. या मुद्द्यावरून योगी सरकारवर चहू बाजूने टीका होत असताना आज संसदेत या घटनेवरून प्रचंड गदारोळ झाला. यावेळी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रामगोपाल यादव यांनी योगी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्या चेंगराचेंगरीत हजारो लोकांचा मृत्यू झाला असून त्यातल्या काहींचे मृतदेह गंगा नदीत फेकले किंवा जमिनीत पुरल्याच्या घटना समोर येत असल्याचा आरोप रामगोपाल यादव यांनी केला आहे.
राम गोपाल यादव यांनी सभात्यागानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना योगी सरकारवर गंभीर आरोप केले. ही चेंगराचेंगरी म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, चेंगराचेंगरीत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांना मृतदेह सापडत नाहीत आणि सरकारने अद्याप एकाही अधिकाऱ्यावर कारवाई केलेली नाही. आम्ही याबाबत नोटीस दिली. पण ती फेटाळण्यात आली. त्यामुळे सरकार मृतांची खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
योगी सरकारकडून जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाला ज्यापैकी 25 लोकांची ओळख पटली आहे. मात्र विरोधी पक्ष आणि अन्य सूत्रांच्या मते मृतांचा आकडा हजारांवर पोहोचू शकतो. तर रामगोपाल यांनी आरोप केला आहे की, योगींच्या आदेशानुसार मृतांचा आकडा 30 च्या वर जाता कामा नये. काही मृतदेह गंगेत फेकण्यात आले आणि काही मातीत पुरण्यात आले. अधिकारी लोकांना मृतदेह पाठवण्यासाठी पैसे देत आहेत जेणेकरून त्यांची आकडेवारी वाढू नये. रामगोपाल यादव यांनी न्यायलयीन तपासाला आयवॉश म्हणत, हिंमत असेल तर योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी समिती स्थापन करावी, असे आव्हान दिले आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत किती लोकांचा मृत्यू झाला याची नेमकी संख्या अद्याप समजलेली नाही. महाकुंभात चेंगराचेंगरी आणि बेपत्ता झालेल्या लोकांच्या मुद्द्यावर, विरोधकांनी हा मुद्दा संसदेपासून रस्त्यावर उचलला जाईल, असे स्पष्ट केले आहे.