बसंतीचा टांगा पलटी… म्हणे चेंगराचेंगरी ही मोठी घटना नव्हे!

बसंतीचा टांगा आज पलटी झाला. उत्तर प्रदेशातील महापुंभदरम्यान झालेली चेंगराचेंगरी ही काही मोठी घटना नसून त्याचा विरोधकांकडून विनाकारण बाऊ केला जात असल्याचे असंवेदनशील विधान भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी केले.

प्रयागराज संगमावर 29 जानेवारीला मौनी अमावास्येच्या दिवशी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. यात 30 भाविकांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाल्याचे उत्तर प्रदेश सरकारची अधिकृत आकडेवारी सांगते. प्रत्यक्षात मृतांचा आकडा खूप जास्त असल्याचे समोर येत आहे. अनेक गावांतील महापुंभला गेलेले नागरिक परत आलेले नाहीत. चेंगराचेंगरीत बळी गेलेल्यांचा आकडा लपविला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर हेमा मालिनी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत.

इतक्या संख्येने लोक इथे येत आहेत त्याचे नियोजन करणे कठीण आहे, परंतु आम्ही ते करतो आहोत, असे हेमा मालिनी म्हणाल्या. हेमा मालिनी यांनी या दुर्घटनेच्या दिवशीच अमृतस्नान केले होते. सरकार मृत्यूचा आकडा लपवीत असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, त्यांना काहीही म्हणू द्या. चुकीच्या गोष्टी बोलणे हे त्यांचे काम आहे.

आम्हीही कुंभला गेलो होतो.  तिथे कोणत्याही अडथळ्य़ाविना स्नान केले. त्या ठिकाणी सगळे कसे व्यवस्थित नियोजन केलेले होते. चेंगराचेंगरी झाली हे खरे आहे, परंतु इतके काही मोठे झालेले नाही. या घटनेविषयी अतिशयोक्ती करून सांगितले जात आहे.

 

पप्पू यादव म्हणतात, व्हीआयपी महाकुंभातच मरायला हवेत;

त्यांना मोक्ष मिळेल!

खासदार पप्पू यादव यांनी आज महाकुंभमेळ्यातील चेंगचेंगरीच्या घटनेवरून लोकसभेत तीव्र संताप व्यक्त केला. चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना मोक्षप्राप्ती झाली, असे विधान धीरेंद्र शास्त्राr यांनी केले होते. त्यावरून पप्पू यादव संतापले. मी कोणत्याही बाबाचे नाव घेणार नाही, पण कुंभमध्ये ज्यांना मरण आले त्यांना मोक्ष मिळाला, असे ते म्हणालेत. मग जे व्हीआयपी महाकुंभमेळ्यात येत आहेत त्या राजकारणी आणि पैशेवाल्यांना तसेच बाबा आणि नागासाधूंनीही कुंभमेळ्यात डुबकी मारून मरायला हवे. म्हणजे त्यांनाही मोक्षप्राप्ती होईल, असे यादव म्हणाले. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला. पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी त्यांना रोखले.