कुंभमेळ्यात बॉम्बस्फोट घडवून एक हजार हिंदूंना ठार मारण्याची धमकी देणाऱयाचे नाव आयुष जायसवाल असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाला महाकुंभ पोलिसांनी बिहारच्या पूर्णिया जिह्यातील शहीदगंज येथून अटक केली. आयुषने नासिर पठाण नावाच्या शेजारी राहणाऱया तरुणाच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट आयडी बनवला होता. याच आयडीच्या माध्यमातून त्याने कुंभमेळ्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती.
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याने अल्लाह इज ग्रेट आणि कुंभमेळय़ात तुम्ही सर्व मरणार, इंशाअल्लाह असे लिहिले होते. या धमकीनंतर महाकुंभ परिसरात पोलिसांचा फौजफाटा आणखी वाढवण्यात आला होता. सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली होती.
कुंभमेळय़ात बॉम्बस्पह्ट घडवण्याची धमकी दिल्यानंतर याप्रकरणी महाकुंभ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने तपासाची चव्रे वेगाने फिरली. पोलिसांनी इन्स्टाग्राम खात्याच्या आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक करण्यासाठी तीन पथके तैनात केली; परंतु खरा आरोपी आयुष कुमार जायसवाल नेपाळला पळून गेला होता. कसून तपास केल्यानंतर तोच खरा आरोपी असल्याचे सिद्ध झाले. आयुष बिहारला परतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
शेजारी राहणाऱ्याला तुरुंगात डांबायचे होते
महाकुंभ पोलीस आणि बिहार पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत आयुष जायसवाल याला अटक केली. आयुषला प्रयागराज येथे आणण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीनंतरच त्याच्यावर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. आयुष सध्या अकरावीत शिकत असून त्याच्या मनात नासिर पठाण याच्याविरोधात संताप होता. त्याला तुरुंगात डांबण्यासाठीच त्याने त्याच्या नावाचा वापर केला.