कुलदीप, अक्षरची पत वाढणार

हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या आठवडय़ाच्या अखेरीस 2025-26 हंगामासाठी केंद्रीय करार जाहीर करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिरकीपटू कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना ग्रेड ‘बी’ वरून ग्रेड ‘ए’मध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. 2024-25 हंगामासाठी वगळण्यात आलेला मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा करार यादीत समाविष्ट करून घेण्याची अपेक्षा आहे. तसेच वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे ‘ए’ प्लस मध्ये आपले स्थान कायम ठेवण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानने अलीकडेच टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावले. या स्पर्धांमध्ये कुलदीप आणि अक्षर यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. अष्टपैलू अक्षर पटेलनेदेखील दोन्ही स्पर्धांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अक्षरने दुबईच्या कठीण परिस्थितीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाच डावांमध्ये 27.25 च्या सरासरीने 109 धावा केल्या.

अय्यरचे पुनरागमनही पक्के झालेय

गेल्या वर्षी करारातून वगळण्यात आलेल्या श्रेयस अय्यरने काही संस्मरणीय कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफी, इराणी कप आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तुफानी फलंदाजी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या विजयात श्रेयस सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्यामुळे श्रेयसला पुन्हा करारबद्ध करण्याची अपेक्षा आहे.  टी-20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित आणि विराट हे ‘ए प्लस’ श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी हिंदुस्थांनच्या अलीकडच्या सफेद चेंडूच्या जेतेपदाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.