माणुसकीला काळिमा! 12 वर्षांच्या मुलाला विवस्त्र करत निर्घृण मारहाण, 6 तास केला छळ; आरोपींना अटक

राजस्थानच्या कोटामध्ये संतापजनक घटना घडली आहे, एका 12 वर्षीय मुलाला विवस्त्र करुन नाचायला लावले, त्याला मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याला विजेचा झटकाही दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या कोटा येथे एका जत्रे दरम्यान ही घटना घडली आहे. या अमानवीय घटनमेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेच्या तपासाचे आदेश दिले असून याप्रकरणी 6 लोकांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली की, मुलगा बुधवारी रात्री गणेश जत्रेत कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. रात्री काही तरुणांनी त्याच्यावर तारेची चोरी केल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याचे कपडे उतरवून त्याला डान्स करायला भाग पाडले. शिवाय या घटनेचा व्हिडीओही बनवला असून जी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली होती. या व्हिडीओमध्ये सुमारे 7 तरुण मुलाभोवती उभे असल्याचे आणि एक व्यक्ती खुर्चीवर बसल्याचे दिसत होते. आणखी एक तरुण हातात जू घेऊन मुलाला ‘मी चोर आहे’ असे म्हणण्यास भाग पाडतो. तसे न बोलल्यास त्याला बुटाने मारहाण केली.

पीडित मुलाने नंतर खुलासा केला की, त्याला केवळ विवस्त्र करुन नृत्य करायला लावले नाही, तर त्याला विजेचा धक्का दिला. सुमारे 6 तास या अत्याचाराला सामोरे गेल्यानंतर आरोपींनी तिला सकाळी साडेसहा वाजता सोडून दिले. मुलाच्या आईने सांगितले की, जर तिच्या मुलाने चोरी केली असेल तर आरोपीने पोलिसांना बोलावायला हवे होते. असा अमानुष छळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 6 तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.