Kopargaon News – प्रसंगावधान राखत महिलेचं धाडस, अंगावरच्या साडीच्या आधाराने पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवलं

गोदावरी नदीच्या पाण्यात तीन सख्खे भाऊ नदीतील मोटारी काढण्यासाठी गेले असता पाण्यामध्ये वाहून गेले. शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या ताईबईंच्या हे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत अंगावरील साडी काढून नदी पात्रात फेकली आणि दोघांचे प्राण वाचवले. मात्र दुर्दैवाने तिसऱ्या भावाला वाचवण्यात त्यांना अपयश आले. ताईबाईंच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नाशिक दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधारेने धरण 80 टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातून हळूहळू 11,000 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहु लागली. परिणामी नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. यात कोपरगाव तालुक्यातील तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे सख्खे भाऊ नदीतील मोटारी काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले होते. मात्र पाण्याचा जोर जास्त असल्याने तिघेही पाण्यात वाहून गेले. याचवेळी शेजारी शेळ्या चरणाऱ्यासाठी घेऊन आलेल्या मंजूर गावातील ताईबाई छबूराव पवार आणि पती छबूराव बाबूराव पवार यांच्या हा सर्व प्रकार निदर्शणास आला. त्यांनी क्षणाचाही विचार न करता तरुणांच्या मदतीसाठी धाव घेतली. ताईबाई पवार यांनी प्रसंगावधान दाखवत अंगावरील साडी काढून नदी पात्रात फेकली आणि त्या साडीला धरून प्रदीप आणि अमोल या दोघांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. मात्र दुर्दैवाने संतोषला वाचविण्यात ताईबाई यांना अपयश आले. ताईबाईच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.