कोकण रेल्वेच्या जादा गाड्यांची रखडपट्टी, गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या जादा गाडय़ांची पाच ते सहा तास रखडपट्टी होत आहे. कोकण रेल्वेच्या नियमित गाडय़ा आणि अतिरिक्त गाडय़ांच्या वेळेचे नियोजन करण्यात अडचणी येत आहेत. त्याचा अधिक फटका जादा गाड्यांना बसत आहे. त्यामुळे अधिकचे पैसे मोजून जादा गाडय़ांची तिकिटे काढलेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्याने कुटुंबीयांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांनी गावाकडे मोर्चा वळवला आहे. तुलनेत कोकणात जाणाऱ्या मुंबईकर, ठाणेकरांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने यंदाही उन्हाळी विशेष गाडय़ा सोडल्या आहेत. रेल्वे प्रशासनाचा नियमित गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होऊ न देण्यावर भर असतो. त्या नियमित गाड्यांच्या वेळा सांभाळून अतिरिक्त उन्हाळी गाडय़ा चालवताना रेल्वे प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. अनेकदा नियमित गाडय़ांसाठी मार्ग मोकळा करून देताना जादा गाडय़ांना सायडिंगला ठेवले जात आहे. त्यात प्रत्येक वेळी जवळपास अर्धा तास खर्ची जात आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे येथून उन्हाळी विशेष गाडय़ांतून सिंधुदुर्गात जाणारे चाकरमानी पाच ते सहा तास उशिराने आपल्या गावी पोहोचत आहेत. सध्या उकाडय़ात प्रचंड वाढ झाली आहे. तसेच जादा गाडय़ांना खूप गर्दी असते. अशा परिस्थितीत जादा गाड्या उशिराने धावल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होणार नाही याच दृष्टिकोनातून जादा गाड्यांचे वेळापत्रक निश्चित केले पाहिजे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

दुपदरीकरणाचे काम रखडल्याचा फटका

कोकण रेल्वे मार्गावरील दुपदरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे. दुपदरीकरण पूर्ण झालेल्या रोहापर्यंत गाडय़ा वेळेवर धावतात. मात्र त्या पुढील प्रवासात दुहेरी मार्ग नसल्याने जादा गाडय़ांना वेळोवेळी थांबवले जात आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडलेल्या जादा गाडय़ा प्रवाशांसाठी गैरसोयीच्याच ठरत आहेत.

उन्हाळी हंगामात कोकण रेल्वेच्या नियमित गाडय़ांचे तिकीट मिळेनासे होते. आम्ही अधिक पैसे मोजून विशेष गाडय़ांचे तिकीट काढतो, पण विशेष गाडय़ा वेळोवेळी सायडिंगला टाकतात. त्यात आमची खूप गैरसोय होते. रेल्वे मंत्रालयाने दुपदरीकरणाचे काम वेळेत पूर्ण करावे. – शशिकांत राणे, डोंबिवली