कोकण रेल्वेची वाहतूक कधी सुरू होणार? मिळाली मोठी माहिती….

कोकण रेल्वेमार्गावरील कारवार येथील मदुरे-पेडणे विभागादरम्यानच्या पेडणे बोगद्यात जमीनीतून पाणी आले आणि ते वाहत होते. मंगळवारी रात्री ३ वाजता बोगद्यात पाणी जास्त तीव्रतेने वाहत होते. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या घटनेनंतर तातडीने या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तसेच या मार्गावरील सेवा लवकरच पूर्ववत करण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या बोगद्यात सुरू असलेल्या कामाबाबत कोकण रेल्वे मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी माहिती दिली. अचानक या बोगद्यात जमीनीखालून मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात झाली. तसेच तो प्रवाह वाढत होता. अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. मॉन्सूनपूर्वी तीन महिने आधीच या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येतात. मात्र, अशा प्रकारची समस्या पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. आता या ठिकाणी 100 मजूर काम करत असून येथील चिखल आणि माती काढण्याचे काम सुरू आहे. तसेच जमीनीखालून येणाऱ्या पाण्याच प्रवाह रोखण्यात यश आले आहे. या पाण्याच्या प्रवाहाने बोगद्यामध्ये माती, चिखल साचला होता. येथील गाळ आणि चिखल साफ करण्यात आला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे असे संतोषकुमार यांनी सांगितले.