उद्या कोकण रेल्वे उशिराने धावणार, ओव्हरराइडिंग स्विच बदलण्यासाठी रोह्यात ब्लॉक

konkan-railway

पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेपाठोपाठ येत्या मंगळवारी कोकण रेल्वेवरही ब्लॉक घेतला जाणार आहे. रोहा यार्डमधील अप मार्गावरील पॉइंट क्रमांक 126ब आणि 127ए च्या ओव्हरराइडिंग स्विच बदलाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 पर्यंत ब्लॉक घेतला आहे. या काळात एक्स्प्रेस उशिराने धावणार आहेत.

रोहा यार्ड येथील अप मार्गावरील ओव्हरराइडिंग स्विच ऑफ पॉइंट बदलला जाणार आहे. विशेष वाहतूक ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वेने विविध एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केला असून त्या गाडय़ा जवळपास 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत. 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस, 16346 तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस, 12617 एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस, 19577 तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस या गाडय़ांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. 16346 तिरुवनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेसला रोहा स्थानकावर दोनदा थांबवली जाणार आहे. दुपारपर्यंतच्या ब्लॉक अवधीत काम पूर्ण केल्यानंतरही कोकण रेल्वे पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही तास लागू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महिनाखेरीपर्यंत चाकरमान्यांचे हाल

मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्र. 12, 13च्या विस्तारीकरणाचे काम केले जात आहे. त्यामुळे कोकणातून मुंबईला येणाऱया ट्रेनच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. मंगळुरु ते सीएसएमटी एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 12134) ठाण्यापर्यंत, तर मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 22120) आणि मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 12052) दादरपर्यंत चालवली जाईल. 28 फेब्रुवारीपर्यंत हे वेळापत्रक असणार आहे.