ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे तीन तास ठप्प, आडवली येथील घटना; अनेक गाड्या खोळंबल्या

कोकण रेल्वे मार्गावरील लांजा तालुक्यातील आडवली स्थानक येथे आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक ओव्हरहेड वायर तुटल्याने या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र कोकण रेल्वेच्या कर्मचारी यांनी अथक प्रयत्न करत ही वायर जोडून पूर्ववत केल्याने वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

कोकण रेल्वे मार्गावरील लांजा तालुक्यातील आडवली स्थानक येथे वायर तुटल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. पंरतु कोकण रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे अवघ्या चार तासांतच वायर जोडण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आणि रखडलेल्या सर्व गाड्या पुन्हा मार्गस्थ झाल्या असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, आडवली स्थानक येथे सावंतवाडी-दिवा ही पॅसेंजर गाडी चार तास थांबवण्यात आली होती, तर उर्वरित या मार्गावरून जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या त्या त्या स्थानकादरम्यान थांबून ठेवण्यात आल्या होत्या. वायर तुटल्याने प्रवाशांना मात्र चार तास या मार्गावर ताटकळत राहावे लागल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली.