कोकण रेल्वे 26 तास ठप्प; हजारो प्रवासी लटकले… प्रचंड हाल

अतिवृष्टीमुळे कोकणात दाणादाण उडाली असून याचा मोठा फटका कोकण रेल्वेला बसतोय. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी येथे रविवारी सायंकाळी दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली. विविध स्थानकांमध्ये प्रवासी रात्रभर रेल्वेमध्ये अडकले. 19 गाडय़ांचे मार्ग वळविण्यात आले तर 27 गाडय़ा रद्द करण्यात आल्या. त्यातच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात व्यत्यय येत होता. डोंगरावरील माती सतत ट्रकवर येत होती. 26 तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोकण रेल्वे सेवा पुन्हा रुळावर आली.

सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास मांडवी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, रेल्वेसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना मुंबईत सोडण्यासाठी कोकण रेल्वेने एसटीकडून 68 बस घेतल्या होत्या तर काही प्रवाशांनी खासगी गाडय़ा करून मुंबई गाठली. गेले तीन दिवस रत्नागिरी जिह्याला अतिमुसळधार पावसाने झोडपले. रविवारी सायंकाळी कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी येथे दरड कोसळली त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली.

तेजस एस्क्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकात तर कोकणकन्या एक्स्प्रेस वेरवली स्थानकामध्ये थांबवण्यात आली. सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस दिवाणखवटी येथे तर कोचीवली एक्स्प्रेस चिपळूण येथे थांबवली. रेल्वे गाडी सुरू होईल या आशेवर प्रवाशांनी रात्र गाडीत काढली. रत्नागिरीत प्रशासनाकडून प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. दिवस उजाडला तरी कोकण रेल्वे ठप्पच होती. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दिवाणखवटीतील दरड काढण्यात व्यत्यय येत होता.त्यामुळे रेल्वेमार्ग सुरळीत होण्यास विलंब लागला.  दुपारी रेल्वेरुळावरील दरड हटवण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता रेल्वेरुळ रेल्वेगाडय़ा धावण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

रत्नागिरीतील पूरस्थिती ओसरली

अतिवृष्टीमुळे खेडमधील जगबुडी नदी, नारिंगी नदी, चिपळूणातील वशिष्ठी नदीला पूर आला होता. सोमवारी पाऊस कमी होताच जिह्यातील पूरस्थिती ओसरली. धोक्याच्च्या पातळीवर वाहणाऱ्या जगबुडी आणि कोदवली नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. जिह्यातील अन्य सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत.

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान

पावसामुळे जिह्यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.मंडणगड तालुक्यातील मंडणगड-पुरार खेड रस्त्यावर झाड व दरड कोसळल्याने वाहतुक अर्धा तास बंद करण्यात आली आहे. खेड-दापोली मार्गावर पाणी भरल्याने पर्यायी मार्गांवरील वाहतूक बंद केली. भिंगलोली येथील आझाद कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावर असलेल्या फ्लॅटच्या भिंती व गॅलरी मधील ग्रीलवर समोरील बिल्डिंगची संरक्षण भिंत कोसळून सुभाष पांडुरंग सिंगारे व प्रमोद आनंदराव मोरे यांच्या फ्लॅटचे नुकसान झाले. खेड तालुक्यातील भिलारे येथे पाण्यात म्हैस वाहून गेली. शेलडी येथील जयंत रामचंद्र आंब्रे (28) हा तरुण पोहण्यासाठी गेला असता पाण्यात वाहून गेला आहे.

अनेक गाडय़ा रद्द, काहींचे मार्ग बदलले

दिवाणखवटी येथे दरड कोसळल्यानंतर कोकण रेल्वेला अनेक गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. त्यामध्ये सीएसएमटी- मंगळूरु एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, रत्नागिरी -दिवा पॅसेजर, जनशताब्दी एक्स्प्रेस, दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेस, सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर या गाडय़ा रद्द करण्यात आल्या. पुणे-एर्नापुलम एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, गांधीधाम-नागरकोईल एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-एर्नापुलम एक्सप्रेस, उधाना-मंगळुरु एक्स्प्रेस या गाडय़ा कल्याण लोणावळामार्गे वळवण्यात आल्या. हजरत निजामुद्दीन- तिरुअनंतपुरम एक्सप्रेस ही पनवेलवरुन वळवण्यात आली तर हजरत निजामुद्दीन – एर्नापुलम एक्सप्रेस
भुसावळ – मनमाडमार्गे वळवण्यात आली.

एसटी मदतीला धावली 

प्रवाशांना मुंबईत सोडण्यासाठी कोकण रेल्वेने एसटीचा आधार घेत 68 बस मागवल्या. त्यापैकी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर 40 बस पाठवल्या. त्यापैकी 32 बसमधून प्रवाशांना मुंबईत पाठवण्यात आले. काही प्रवाशांनी खासगी गाडय़ांमधून मुंबई गाठली.