तब्बल 26 तासानंतर कोकण रेल्वे सुरू; खोळंबलेल्या गाड्या मार्गस्थ

अतिवृष्टीमुळे कोकणात दाणादाण उडाली असून अतिवृष्टीचा फटका कोकण रेल्वेला बसला. कोकण रेल्वेमार्गावरील दिवाणखवटी येथे रविवारी सायंकाळी दरड कोसळल्यामुळे तब्बल 26 तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होती. विविध रेल्वेस्थानकांमध्ये अडकलेल्या रेल्वेगाड्यांतील प्रवाशांचा रात्रभर गाड्यांमध्येच खोळंबा झाला. अखेर त्या खोळंबलेल्या सर्व गाड्या सकाळी रदद करून प्रवाशांना मुंबईत सोडण्यासाठी कोकण रेल्वेने एसटीची मदत घेतली. कोकण रेल्वेने एसटीकडून 68 बस घेतल्या. काही प्रवाशांनी मात्र खासगी गाड्या करून मुंबई गाठली. दुपारनंतर रेल्वेरुळावरील दरड हटवण्यात यश आले. संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या रेल्वेरुळ वाहतुकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

गेले तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. रविवारी सायंकाळी कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी येथे दरड कोसळली. दरड कोसळताच कोकण रेल्वे ठप्प झाली. तेजस एस्क्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकात थांबवण्यात आल्या. कोकणकन्या एक्स्प्रेस वेरवली स्थानकामध्ये थांबवण्यात आली. सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस दिवाणखवटी येथे तर कोचीवली एक्स्प्रेस चिपळूण येथे थांबवण्यात आली होती. या गाड्यांतील सर्व प्रवासी रात्रभर गाडीतच अडकून पडले. रत्नागिरीत प्रशासनाकडून प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. रेल्वेगाडी सुरु होईल या आशेवर प्रवाशांनी रात्र गाडीत काढली. दिवस उजाडला तरी कोकण रेल्वे ठप्पच होती. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दिवाणखवटीतील दरड काढण्यात व्यत्यय येत होता. तसेच डोंगरातील माती सतत ट्रॅकवर येत होती. त्यामुळे रेल्वेमार्ग सुरळीत होण्यास विलंब लागला.

रत्नागिरीतील पूरपरिस्थिती ओसरली
अतिवृष्टीमुळे खेडमधील जगबुडी नदी, नारिंगी नदी, चिपळूणातील वशिष्ठी नदीला पूर आला होता. सोमवारी पावसाचा जोर कमी होताच जिल्ह्यातील पूरपरिस्थिती ओसरली. धोक्याच्या पातळीवर वाहणाऱ्या जगबुडी आणि कोदवली नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. जिल्ह्यातील अन्य सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत.