
कोकण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला 523 किलोमीटर लांबीचा रेवस ते रेडी या चार पदरी सागरी महामार्गाचे काम गेली 30 वर्षे अपूर्णच आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत महामार्गाचे काम पूर्ण करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने मंत्री दादा भुसे यांनी दिले.
विधान परिषदेत सदस्य निरंजन डावखरे यांनी रेवस ते रेडी या चार पदरी सागरी महामार्गाचे काम गेल्या 30 वर्षांपासून अपूर्ण असून त्याचा खर्च 2 हजार कोटींवरून आता 10 हजार कोटींवर गेला आहे हे खरे आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर दादा भुसे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, हा महामार्ग 30 वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. काही ठिकाणी तो साडेपाच मीटर आहे, तर काही ठिकाणी तो 7 मीटर आहे. आता तो चार मार्गिकांचा केला जाणार आहे. हा रस्ता आता पूर्णतः नवीन होणार आहे. त्यामुळे त्याच्या खर्चात वाढ झाली आहे, असे म्हणणे योग्य नाही. 523 किलोमीटर असलेल्या या रस्त्यासाठी 26 हजार 463 कोटी रुपये खर्च येणार आहे.
दोन टप्प्यांत होणार काम
हा रस्ता दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात 9 पूल प्रस्तावित असून त्यासाठी 9 हजार 105 कोटी रुपये खर्च येणार आहे. रेवस, करंजा, रेवदंडा, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड, काळबादेवी, कुणकेश्वर या 9 ठिकाणी हे पूल होणार आहेत. या नऊ पुलांपैकी पाच पुलांची वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. दोन पुलांचे कॉण्ट्रक्ट दिले आहे. दाभोळ आणि काळबादेवी पुलांसदर्भात काही तांत्रिक बाबी आहेत. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यात रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यासाठी 17 हजार 357 कोटी रुपये खर्च येणार आहे. रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
सागरी महामार्गाची वैशिष्टय़े
- सागरी महामार्गाची लांबी 523 किलोमीटर
- सागरी महामार्गासाठी येणारा खर्च 26 हजार 463 कोटी
- सागरी महामार्गाचे एकूण टप्पे 2
- पुलांसाठी येणारा खर्च 9 हजार 105 कोटी
- रस्त्यांसाठी येणारा खर्च 17 हजार 357 कोटी
- पर्यटन स्थळे संलग्न करणार