रात्री 11 नंतर शीतपेय विकण्यास बंदी; 24 तास मेडिकलच्या नावावर जनरल स्टोअर्स चालवणाऱ्यांची पोलिसांनी उडवली झोप

>> दुर्गेश आखाडे

24 तास सेवा देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना आता रात्री 11 नंतर शीतपेय विकता येणार नाहीत. रत्नागिरी पोलिसांनी दिवस-रात्र सेवा देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना नोटीसा बजावून रात्री 11 नंतर शीतपेय विकू नयेत अशा सूचना दिल्या आहेत. जर कोणी मेडिकल विक्रेता शीतपेय विकताना दिसला तर त्याला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अंमली पदार्थाच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. डिप्रेशनच्या गोळ्या शीतपेयात टाकून त्याची नशा करणारी मंडळी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही मोहिम उघडण्यात आली आहे.

24 तास मेडिकलच्या नावावर जनरल स्टोअर्स चालवणाऱ्यांची पोलिसांनी झोप उडवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. पोलिसांकडून कारवाई सुरू असताना आणखी एक माहिती पुढे आली ती म्हणजे डिप्रेशनच्या गोळ्या शीतपेयात टाकून शीतपेय नशा म्हणून प्यायली जातात.

रात्री उशीरा काही मेडिकलमध्ये शीतपेय मिळतात. ही शीतपेय घेऊन नशाबाज मंडळी नशा करतात. त्यामुळे पोलिसांनी 24 तास सुरु असलेल्या मेडिकल दुकानांना नोटीसा काढून त्यांची झोप उडवली आहे. अशा मेडिकलना 24 तास फक्त औषधे विकण्यासाठीच परवानगी असते. अन्य वस्तू अर्थात शीतपेय आणि आईस्क्रीम विकायला परवानगी नसते.

पण अनेक मेडिकल दुकानदार रात्रभर औषधांपेक्षा जनरल स्टोअर्सची सेवा देतात. अशा सर्व 24 तास सेवा देणाऱ्या मेडिकल दुकानांना नोटीसा काढून रात्री 11 नंतर शीतपेय विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री अकरानंतर जर कोणी मेडिकल दुकानदार शीतपेय विकताना आढळला तर त्याला 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

पोलिसांच्या कारवाईनंतर धाबे दणाणले

दिवस-रात्र सेवेच्या नावावर 24 तास जनरल स्टोअर्स चालवणाऱ्या मेडिकल दुकानदारांचे पोलिसांच्या आदेशानंतर धाबे दणाणले आहेत. काही मेडिकलवाल्यांनी तर बाहेर फलकच लावून टाकला आहे. रात्री 11 नंतर आईस्क्रीम, शीतपेय व अन्य अन्नपदार्थ मिळणार नाहीत. फक्त औषधे मिळतील.