
लेलो भय्या लेलो कोकण का हापूस लेलो.. अशी हाकाटी देऊन अनेकदा खवय्यांच्या माथी कर्नाटकचा आंबा मारला जातो. मात्र आता ही फसवणूक थांबणार असून हापूस कोकणातील आहे की कर्नाटकातील एका झटक्यात कळणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील 1 हजार 845 बागायतदारांनी जीआय टॅग मिळवले आहेत. त्यामुळे हापूसच्या पेट्यांवर लावलेले क्यूआर कोड स्कॅन करताच ग्राहकांना आपण विकत घेत असलेला हापूस कोकणातील आहे की कर्नाटकातील हे एका झटक्यात कळणार आहे.
कोकणातील हापूसला जीआयचे संरक्षण मिळाल्यामुळे बनावट आंबे सहज ओळखता येणार आहेत. हापूस आंब्याचा जीआय टॅग कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या फळांसाठी राखीव असणार आहे. रसाळ चव आणि रंगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आंब्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही आंब्यांना हापूस टेंग वापरता येणार नाही. तसेच फळ उत्पादक आणि विक्रेत्यांची सहकारी संस्था असलेल्या संघाने कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या इतर प्रदेशांमध्येदेखील उत्पादन होणाऱ्या आंब्यांसाठी वापरला जाणारा हापूस या संज्ञेच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.
तर कारवाईचा बडगा उगारणार
एका विशिष्ट प्रदेशात उत्पादित होणाऱ्या कृषी मालांनाच फक्त जीआय मानांकन लागू होते. कोकणाव्यतिरिक्त अन्य भागांत उत्पादित होणाऱ्या एखाद्या फळाच्या ब्रौंडंगसाठी हा टॅग वापरल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. कोकणातील आंबा व्यावसायिकांनी हापूसच्या ब्रँडचे होत असलेले उल्लंघन रोखण्यासाठी बाजार समित्या आणि राज्य पणन मंडळाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. राज्यातील अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी फळांच्या गुणवत्तेची खात्री देण्यासाठी जीआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.