महाराष्ट्राच्या उद्योग मंत्र्यांचा हेतू शुद्ध नाही. संकट तयार करायचे आणि ते संकट मी दूर केले असे दाखवायचे, अशी त्यांची स्टाईल आहे. जमीन मालकाचा नव्हे तर फक्त गुंतवणूकदारांचा फायदा करून देण्यासाठी एमआयडीसीच्या घोषणा होत आहेत. हे नक्की काय सुरू आहे, याचा तपास करण्यासाठी कोकणातील ‘एमआयडीसी’च्या घोषणांची ‘सीआयडी’ चौकशी करावी, अशी मागणी भाजपचेच माजी आमदार बाळ माने यांनी केल्यामुळे मिंधे गटाचे मंत्री असलेल्या उद्योग खात्यात खळबळ उडाली आहे.
बाळ माने यांच्या मागणीमुळे कोकणातील उद्योग खात्यात सुरू असलेल्या घोटाळ्याला पुन्हा एकदा वाचा फुटली आहे. माजी आमदार बाळ माने म्हणाले की, मिऱ्या गावातील ग्रामस्थांना थेट नोटिसा आल्या आहेत. कोणताही वारस तपास केलेला नाही. आता बोंबाबोंब झाल्यानंतर उद्योग मंत्री गाववाल्यांशी बोलणार आहेत. तुम्ही चार वेळा याच मतदार संघात निवडून आलात तेव्हा जनतेची कदर करायला पाहिजे होती, असा सल्ला माजी आमदार बाळ माने यांनी दिला आहे.
मिऱ्या गावात वनौषधी आहेत. त्यामुळे लॉजिस्टिक पार्क त्या ठिकाणी सोयीचे नाही. स्थानिकांना रोजगार देणारी भारती शिपयार्ड बंद पडली. त्या वेळी त्या कंपनीची काळजी केली नाही. आज जे.के. फाईल्स कंपनी बंद पडली. निवडणुका आल्या की घोषणा केल्या जातात. गेल्या 20 वर्षांत स्थानिक आमदारांनी केलेल्या घोषणांवर एक ग्रंथ तयार होईल, असा टोला बाळ माने यांनी सामंतांना हाणला आहे.