मंडणगड धुत्रोळी रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

मंडणगड धुत्रोळी येथील रस्त्यात पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्याची चाळण तर झाली आहेच मात्र हा रस्ता आता मृत्यूचा सापळा ठरण्याचा धोका अधिक वाढला आहे. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुन जा-ये करावी लागत आहे.  त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.

मंडणगड तालूका मुख्यालयाकडून भिंगळोली मार्गे धुत्रोळीकडून म्हाप्रळ आंबेत मुंबई पूणे या महत्वाच्या शहराकडे जाणाऱ्या रस्त्याचे म्हाप्रळ या महसुली गावाच्या हद्दीपासून पुढे चिंचाळी, शेनाळे, शिरगाव, धुत्रोळी, मंडणगडकडे येणारा रस्ता हा पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. सध्या हा मार्ग लोणंद राजेवाडी ते आंबडवे राष्ट्रीय महामार्ग नावाने नव्याने विकसीत होत आहे. त्यामुळे या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी आता राहीलेली नाही तर ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची झालेली आहे. मात्र नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या नावाखाली तो रस्ता वाहतुक योग्य राहीलेला नाही. त्यामुळे नवा रस्ता पूर्ण होईतोवर किमान रस्त्यातील खड्डे बूजवून मार्ग वाहतुकीस सुरळीत करावा. कारण या मार्गाशिवाय केवळ मंडणगड येथीलच नव्हे तर काही दापोली तालूक्यातीलही गावातील रहीवाशांना पूणे मुंबईकडे ये जा करण्यासाठीचा अन्य पर्याय नाही आणि रस्त्याची सुधारणाही नाही त्यामुळे खड्डयातील रस्त्यातून तर आहेच शिवाय मृत्यूच्या सापळयातूनच जणू प्रवास करण्याची वेळ प्रवास करणा-यांवर आलेली आहे.

कारण गेल्या 4 वर्षापासून आंबडवे या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ गावाकडे जाणाऱ्या आणि नव्याने तयार होणा-या राष्ट्रीय महामार्गाचे अगदीच संथ गतीने काम सुरू आहे. त्यामुळे आधी आहे त्या रस्त्यातील तरी खड्डे बुजवण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खड्डे बुजवून रस्ता वाहतुक योग्य करण्याचे नावही घेत नाही. आणि कोणी तक्रार केलीच तर कोणालाही ते पुसतही नाहीत त्यात लोकप्रतिनिधीनी या महत्वाच्या कामाकडे केलेले दुर्लक्ष हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी वर्गाला चांगलेच फावत असून रस्त्यातील खड्डे बुजविण्यास होणारा विलंब हा या मार्गावरून प्रवास करणा-यांसह येथील लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा आहे. त्यामुळे एखाद्याचा जीव गेला वा एखाद्याला जीव गमवावा लागल्यावरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जागे होवून खडृडे बूजवण्याचे काम करणार आहे काय ? अशाप्रकारच्या संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.