कोकणची वाट बिकट, अठरा ते वीस तासांचे धक्के पचवत गणेशभक्त गावी

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कासवगतीने होणारी एकमार्गी वाहतूक, जागोजागी पडलेले खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे गणशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची ‘कोकणची वाट अक्षरशः बिकट’ बनली आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगडमध्ये पोहोचण्यासाठी आठ ते दहा तास लागत आहेत, तर सावंतवाडी, देवगड, कुडाळ-वेंगुर्ला अशा तळकोकणात पोहोचण्यासाठी एसटी बस, खासगी ट्रव्हल्सने अठरा ते वीस तासांचे धक्के पचवत गणेशभक्त गावी पोहोचत आहेत.

मिंध्यांचा गलथान कारभार, ढिसाळ नियोजनामुळेच ही स्थिती झाल्याने प्रचंड संताप व्यक्त होत असून रखडपट्टी झाल्याने प्रवासात अडकलेले ज्येष्ठ, महिला व मुलांचे मात्र प्रचंड हाल झाले. चाकरमानी गेल्या दोन दिवसांपासूनच कोकणात जायला निघाले आहेत. मात्र कोकणवासीयांच्या गावच्या मार्गात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि चिखलाचे विघ्न असताना एसटी संपामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा रखडपट्टीमुळे वाटेतच ‘मोरया’ झाला आहे.

म्हणूनच लटपंती

मुंबईतून सुमारे 1100 गाडय़ा बुधवारपासून दोन दिवस झालेल्या संपामुळे अडकून पडल्या होत्या. या गाडय़ा संप मिटल्यानंतर हजारो प्रवाशांसह मुंबई-गोवा महामार्गावर पोहोचल्या नंतर वाहतूककोंडी व खड्डे-चिखलात अडकल्या.

12 कोटी खड्डय़ात

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी सरकारकडून 12 कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र सद्यस्थितीत मुंबई-गोवा महामार्गाची ठिकठिकाणी चाळण झाली असून 12 कोटी रुपये खड्डय़ात गेल्याचे बोलले जात आहे.