खाडीतील पागलेची ताजी मासळी खरेदीसाठी खवय्यांची उडतेय झुंबड

खाडीतील कोळंबी, निवटा, चेवणा, बोईट, शिंगटी, लाल ढोमा, पालू, खेकडी आदी प्रकारची ताजी फडफडीत पागलेची मासळी खरेदी करण्यासाठी मत्स्यहारी खवय्यांची दापोलीत मोठीच झुंबड उडत आहे.

शासनाने 1 जूनपासून 31 जुलै पर्यंतच्या कालावधीसाठी मत्स्य संपतीचे संवर्धन आणि प्रभावी व्यवस्थापन तसेच मासेमारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मोटारीकृत आणि यांत्रिकी मासेमारी बोटींना मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे खवय्ये मत्स्यहारींची मोठीच गैरसोय होत होती. त्यात आता पागलेची मासळी विक्रीसाठी दापोलीत यायला लागल्याने खवय्ये खुश झालेत. एरव्ही 100 ते 200 रूपयांना बऱ्यापैकी मासळीचा वाटा मिळणारा आता 500 रूपये वाटा झाला आहे. तो पण मोजक्याच मासळींचा. तरी सुध्दा खवय्ये मात्र भरमसाठ किंमत मोजून विकत घेत आहेत त्यामुळे सकाळी 8 वाजता विक्रीसाठी आलेल्या पागलेच्या मासळीची तास दोन तासातच विक्री होत आहे. सकाळी 10 वाजण्याच्या नंतर मासे खरेदी साठी येणाऱ्यांच्या हाती काहीही लागत नाही. ज्यांना सकाळी 8 वाजता मासळी विक्रीसाठी येते हे माहीत आहे त्यांनाच ती विकत घेता येते. मागावून आलेल्यांना रित्या हाती जाण्याशिवाय पर्याय नसतो. एवढा या पागलेच्या ताज्या मासळीला खप आहे.

दापोली तालूक्यातील दाभोळ या बंदरापासून अगदी उन्हवरे गावाच्या खाडीपर्यंत मोठया प्रमाणात मासेमार खारवी तसेच भोई समाज पुर्वापार राहत आहे. पारंपारीक मासेमारी करणारे आणि दाभोळ खाडी लगत राहणारे मासेमार हे आपल्या उपजिविकेचे साधन म्हणून पावसाळयात मासेमारीस परवानगी असलेल्या बिगर यांत्रिकी छोटया होडयांच्या सहाय्याने दाभोळ खाडीत जावून ताजी आणि खाडीतील रूचकर विविध प्रकारची मासळी पागून आणत आहेत. मासेमारांनी खाडीतून पागुन आणलेली मासळी ही त्यांच्या मासेमार महिला विक्रेत्या मासळी सकाळच्या वेळेत दापोलीत विक्रीसाठी घेवून येत असतात. चढया दराची मासळी असली तरी ताजी असलेली मासळी मत्स्यहारी खवय्ये पागलीचे मासे म्हणून विकत घेण्यासाठी मोठीच झुंबड करत असतात.