डीव्हीपी इन्फ्राकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करुनही बंधाऱ्याचे काम रखडलेलेच

मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम दुसरा पावसाळा आला तरी रखडलेले आहे. बंधाऱ्याचे काम करणाऱ्या डीव्हीपी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीला तब्बल 1 कोटी 88 लाख 2 हजार रुपयांचा दंड ठोठावूनही बंधाऱ्याचे काम संथगतीने सुरु आहे. बंधाऱ्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र काम रखडल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. पावसाळ्यात समुद्र खवळल्यानंतर समुद्राच्या लाटा मिऱ्या येथील लोकवस्तीमध्ये शिरतात. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत होते.

मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम व्हावे अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती. राज्यसरकारने मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी 18० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सुमारे 3 हजार 150 मीटरचा हा बंधारा आहे. या बंधाऱ्याचे काम डीव्हीपी इन्फ्रा ही ठेकेदार कंपनी करत आहे. सुरुवातीपासूनच मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम संथगतीने सुरु झाले. प्रत्यक्षात कामाला मुहूर्तच मिळत नव्हता. ग्रामस्थांना बंधाऱ्याचे काम सुरु करण्यासाठी आंदोलने करावी लागली. बंधाऱ्याचे काम रखडल्यामुळे डीव्हीपी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीला प्रत्येक टप्प्यावर दंडही ठोठावण्यात आला. आतापर्यंत चार टप्यांवर डीव्हीपी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीकडून 1 कोटी 88 लाख 2 हजार रुपयांचा दंड पतन विभागाने वसूल केला आहे. मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम संथगतीने सुरु असल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही मिऱ्यावासियांसमोर धोका कायम आहे. 3 हजार 150 मीटर बंधाऱ्यापैकी पहिला बाराशे मीटरच्या टप्प्याचे काम व्हायचे बाकी आहे. बाराशे मीटर ते 3 हजार 150 मीटरचे काम करण्यात आले असून अजून काही किरकोळ कामे बाकी आहेत. सध्या बंधाऱ्याच्या टॉप लेअरचे काम सुरु आहे. दोन-अडीच वर्षाचा कालखंड उलटला तरी मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम अर्थवटच आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.