ग्लोबल वॉर्मिगशी लढण्यासाठी दापोलीतल्या विद्यार्थ्यांनी उपक्रम, केले रानबिया संकलन व परसबाग वृक्षारोपण

क्षितिज कला मंच दापोलीची आगळी वेगळी वृक्षारोपण मोहीम पार पडली. शेतकऱ्यांच्या घराच्या मागे असलेल्या परसबागेत शेतकऱ्यांच्या आवडीचे झाड लावणे आणि मुलांमध्ये निसर्गाबद्दल आवड कुतुहल वाढवणे आणि निसर्गाची ओळख करून देणे या हेतुने रानबिया संकलन स्पर्धा असे या मोहीमेचे स्वरूप होते.

कुठेही झाडे लावून ती जगत नाहीत. पावसाळ्यापुरती ती जगतात मात्र नंतर ती पाणी संरक्षणाअभावी तग धरत नाहीत. यासाठीच क्षितीजने वेगळा पॅटर्न राबवला. तालूक्यातील एक गाव निवडायचं तिथल्या शेतकऱ्याला भेटायचं आणि त्याच्या परसबागेत जागा असेल तर त्याच्या आवडीचे झाड त्याला द्यायचे आणि ते परसबागेत त्याच्याकडून लावून घ्यायचे आवडीचे झाड असल्याने व परसबाग बांधलेली असल्याने झाडाचे संरक्षण होते. शेतकऱ्याकडून नियमित पाणी घातले जाते त्यामुळे झाड जगते. या पॅटर्नमुळे झाडे जगण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यावर्षी अडखळ गावातील बौध्दवाडी आणि घागवाडी या दोन वाडयांतील 45 शेतकऱ्यांच्या परसबागेत झाडे लावली गेली. ही झाडे अमोल मुंगसे यांनी दिली. त्याचबरोबर यावर्षी चंद्रनगर शाळेत रानबिया गोळा करण्याची स्पर्धा घेण्यात आली. मे महिन्याच्या सुट्टीत ही स्पर्धा घेण्यात आली. जो विदयार्थी जास्तीत जास्त रानबिया गोळा करेल त्याला बक्षिस असे स्वरूप होते. या स्पर्धेत 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या बक्षिस वितरणासाठी डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सेवा निवृत्त कुलसचिव डाॅ. प्रमोद सावंत, जालगाव ग्राम पंचायतीचे सरपंच आणि सुप्रसिध्द विकासक अक्षय फाटक, जेष्ठ कवी सुदेश मालवणकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मोहन मुळे, अमोल मुंगसे, सरपंच भाग्यश्री जगदाळे, शाळा कमेटी अध्यक्ष रूपेश बैकर, ग्राम पंचायत सदस्या गौरी मुलुख, पोलिस पाटील गौरी पागडे, शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, शिक्षिका मानसी सावंत, बाबु घाडीगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डाॅ. प्रमोद सावंत यांनी मुलांना या स्पर्धेचे वेगळेपण समजावून सांगितले. तर जेष्ठ कवी सुदेश मालवणकर यांनी ग्लोबल वाॅर्निग आणि निसर्ग या बद्दल मुलाना माहीती दिली. तर अक्षय फाटक यांनी क्षितजच्या वेगवेगळया उपक्रमंाचे कौतुक करत सहकार्य देण्याचे अभिवचन दिले. या स्पर्धेत आरोही महेश मुलूख हीने तब्बल 473 रानबिया जमवून पहिला क्रमांक तर श्रेयश अनिल शिगवण याने 426 रानबिया जमवून दुसरा क्रमांक पटकावला. व स्वरा श्रीकांत कोलंबे हीने 351रानबिया गोळा करून तृतिय क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाबू घाडीगावकर यांनी केले. यावेळी क्षितिज कला मंचाचे संस्थापक सुनिल कदम, उपाध्यक्ष उमाकांत देवघरे, रूपेश सावंत, वैभव सावेकर, अजित सुर्वे आदी उपस्थित होते.