कोकणातला काजू संपूर्ण हिंदुस्थानात नंबर एकवर, दरवर्षी 1.81 मेट्रिक टन काजूचे उत्पादन

महाराष्ट्रातील काजू संपूर्ण देशात अव्वल क्रमांकावर असून महाराष्ट्रातील काजूची गुणवत्ता सर्वोत्तम आहे. त्यामध्ये फॅटचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे काजू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या काजू हंगामाच्या अनुदानासाठी राज्याच्या सहकार विभागाने सुमारे 279 कोटी रुपयांचे अनुदान देण्यास मान्यता दिली आहे.

महाराष्ट्रात सुमारे 1 लाख 91 हजार हेक्टरवर काजूची लागवड होते. त्यातून सुमारे 1 लाख 81 हजार मेट्रिक टन काजूचे उत्पादन होते. विशेष म्हणजे देशात महाराष्ट्राची काजू उत्पादकता सर्वाधिक म्हणजे प्रतिहेक्टरवर 982 किलो काजूचे पीक मिळते. महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर व पालघर या जिह्यांमध्ये काजूचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. महाराष्ट्रातील काजूची गुणपत्ता सर्वोत्तम असून त्यामध्ये फॅटचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे सहकार विभागाच्या प्रस्तावात नमूद केले आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ला काजूला भौगोलिक मानांकन मिळालेले आहे

या पार्श्वभूमीवर विशेषतः कोकण विभागातील तसेच कोल्हापूर जिह्यातील काजू उत्पादकांनी गोवा राज्याच्या धर्तीवर काजूला हमीभाव देण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्यामुळे राज्यातील काजू उत्पादक शेतकऱयांना काजूची योग्य किंमत उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या सहकार व पणन विभागाने अनेक बैठका घेतल्या. यामध्ये सर्वंकष चर्चा झाली, पण हमीभाव देणे ही बाब पेंद्र सरकारच्या अखत्यारित आहे.