हिंदुस्थानी बुद्धिबळाच्या सुवर्णवर्षाचा शेवटही सोनेरी झाला. हिंदुस्थानची सर्वश्रेष्ठ महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने पुन्हा एकदा फिडे महिला जागतिक जलद अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी बुद्धिबळाची मान उंचावणारी जगज्जेती कामगिरी केली. तिने या स्पर्धेच्या 11 डावांच्या शर्यतीत सर्वाधिक 8.5 गुण संपादत आपले अव्वल स्थान पटकावले. महत्त्वाचे म्हणजे दहाव्या फेरीअखेर 7.5 गुणांसह सात खेळाडू संयुक्तपणे आघाडीवर होते आणि अकराव्या डावात एकटय़ा हम्पीलाच विजयाची नेंद करता आली आणि अन्य सहा जणांना बरोबरीत समाधान मानावे लागले.
हिंदुस्थानचे महिला बुद्धिबळ गेली अडीच दशके गाजवणाऱया कोनेरू हम्पीने 2019 सालीसुद्धा जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती. शेवटच्या फेरीत सात-सात खेळाडू अव्वल असल्यामुळे जगज्जेतेपदासाठी तीव्र संघर्ष अपेक्षित होता, मात्र तसे घडले नाही. संघर्ष टोकाचा झाला, पण सहा खेळाडूंना विजय नोंदवण्यात अपयश आले. हम्पीने मात्र काळय़ा मोहऱयांनिशी खेळताना इंडोनेशियन करिश्मा इरेन सुकंदरचा कडवा प्रतिकार झेलावा लागला. तिने हम्पीवर चांगलाच दबाव निर्माण केला होता, मात्र 48 व्या चालीत करिश्माच्या राजाने केलेली चुकीची चाल हम्पीच्या पथ्यावर पडली आणि तिने या चुकीचा लाभ उठवत 67 व्या चालीअखेर आपल्या जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अन्य लढतींत हिंदुस्थानच्या हरिका द्रोणावल्लीला बरोबरीवर समाधान मानावे लागले. शेवटच्या डावात वर्तमान जगज्जेती आणि अग्रमानांकित चीनच्या जू वेनझूनने टायब्रेकरमध्ये सर्वोत्तम खेळ दाखवल्यामुळे रौप्य पदक काबीज केले तर रशियन लागनो काटेरयाना कांस्य पदकाची मानकरी ठरली.
पुरुषांमध्ये मुरजीन वोलोदर अजिंक्य
हिंदुस्थानच्या अर्जुन एरिगेसीला पुरुषांच्या जलद अजिंक्यपद स्पर्धेत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत रशियाचा 18 वर्षीय मुरजीन वोलोदर 10 गुणांसह विजेता ठरला. त्याने 12 व्या डावात हिंदुस्थानच्या प्रज्ञानंदावर थरारक मात करत जेतेपदाच्या दिशेने आपली पावले टाकली होती आणि 13 व्या फेरीत त्याने अर्मेनियाच्या केरेन गिरगोरयनशी बरोबरी साधत आपले पहिलेवहिले जगज्जेतपद निश्चित केले. रशियन अॅलेक्झांडर ग्रीसचुक दुसरा तर अमेरिकेचा सॅव्हियन सॅम्युएल तिसरा आला. अर्जुन 9 गुणांसह पाचव्या क्रमांकावर राहिला.