पोलिसांनी प्रकरण दडपण्यासाठी पैशांची ऑफर दिली, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या पालकांचा गंभीर आरोप

कोलकाताच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी तुरुंगात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे. याचदम्यान मृत पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनी आम्हाला पैशांची ऑफर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. आम्हाला मृतदेह पाहण्याचीही परवानगी नव्हती. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी नेईपर्यंत पोलीस ठाण्यात थांबावे लागले. मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला त्यावेळी आम्हाला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पैशांची ऑफर दिली होती, पण आम्ही लगेच नाकारली असे मृत पीडितेच्या पालकांनी म्हटले आहे. दरम्यान, कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर देशभरात अद्यापही अनेक ठिकाणी निदर्शने सुरूच आहेत.