आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी संजय रॉय याला आज सियालदाह न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सीबीआयने रॉयला केलेली फाशीची मागणी फेटाळून लावत, हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा नाही. त्यामुळे त्याला मृत्युदंड देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
शनिवारी रॉयला दोषी ठरवण्यात आले होते; परंतु त्याच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. आज सिलायदाह न्यायालयाने त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर रॉयला 50 हजारांचा दंड, तर राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबाला 17 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही दिले. परंतु, पीडितेच्या कुटुंबाने ही भरपाई स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान, संजयच्या शिक्षेसाठी तब्बल 160 पानांचा निकाल लिहिण्यात आला. रॉयला आयपीसीचे कलम 64 (बलात्कार), कलम 66 (मृत्यूस कारणीभूत असणे) आणि 103 (1) हत्या तसेच कलम (66) अन्वये त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आली असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.
पीडितेच्या आईने कोंडून घेतले
आम्हाला या निकालाने धक्काच बसला. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण कसे काय असू शकत नाही? ऑन डय़ुटी डॉक्टरवर बलात्कार होतो आणि त्यानंतर हत्या होऊनही असा निर्णय दिला गेला हे पाहून निराश झाले, असे पीडितेच्या आईने सांगितले. या निकालानंतर पीडितेच्या आईने घरात काsंडून घेतले आणि पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. परंतु, काही वेळाने त्यांनी पीटीआयशी संवाद साधला. दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी नुकसानभरपाई स्वीकारण्यास नकार देत आमचा लढाच असाच पुढे सुरू राहणार असल्याचे सांगितले. दरम्यान, महिलांच्या सुरक्षिततेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचारांविरुद्ध वेळेवर आणि निर्णायक कारवाई करणाऱया यंत्रणांना सतर्क करण्याची सूचना पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी केली.
फाशीच हवी – ममता
या निकालावर मी समाधानी नाही. या प्रकरणाचा तपास राज्य पोलिसांकडून जबरदस्तीने काढून घेतला अन्यथा आरोपीला फाशीची शिक्षा झाली असती. घटना घडल्यापासून आम्ही फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. तरीही आम्ही फाशीच्या मागणीवर ठाम आहोत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.