Kolkata आरजी कारच्या माजी प्राचार्यांच्या मालमत्तेवर ED चे छापे

कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) गुरुवारी कोलकाता येथील चार ठिकाणी छापे टाकले. ज्यात आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या दोन फ्लॅटचा समावेश आहे. याच वैद्यकीय महाविद्यालयात 9 ऑगस्ट रोजी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती.

शहरातील लेकटाऊन आणि तळा अशा दोन भागात ED ने छापे टाकले आहेत. या दोन्ही भागात आरजी कार रुग्णालयाला औषधांचा आणि वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याचे निवासस्थान आहे.

दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पश्चिम बंगालमधील हावडा, सोनारपूर आणि हुगळी येथील अनेक ठिकाणी ED ने छापे टाकल्यानंतर काही दिवसांनी हे नवीन शोध लागले आहेत.

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, केंद्रीय तपास यंत्रणेने आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयातील कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात गुन्हा दाखल केला होता.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या चौकशीच्या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) एफआयआरच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यात डॉ. घोष यांचे नाव घेतले होते.

एफआयआरमध्ये, सीबीआयने आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयामधील आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 सह गुन्हेगारी कट, फसवणूक आणि अप्रामाणिकपणाचा आरोप केला आहे.

संदिप घोष यांनी फेब्रुवारी 2021 ते सप्टेंबर 2023 पर्यंत आरजी कार रुग्णालय आणि महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले. प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा क्रूर बलात्कार आणि खून झाल्याच्या दिवसापर्यंत ते याच पदावर होते.

2 सप्टेंबर रोजी, सीबीआयने डॉक्टर घोष यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली आणि नंतर त्यांना तपास संस्थेच्या कोठडीत पाठवण्यात आले.