पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन, 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (80) यांचे निधन झाले आहे. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी  गुरुवारी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती सीपीआय(एम) चे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी दिली. बुद्धदेव भट्टाचार्य बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनामुळे भट्टचार्य यांच्या कुंटुंबियांकडून शोक व्यक्त केला जात आहे. भट्टाचार्य 2000 ते 2011 दरम्यान पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.

बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य हे दीर्घकाळापासून सीओपीडी (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) आणि वृद्धापकाळाशी संबंधित इतर आजारांनी त्रस्त होते. त्यांच्यावर कोलकाता येथील घरी उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भट्टाचार्य हे सार्वजनिक जीवनापासून दूर होते. त्यांनी 2015 मध्ये सीपीआय(एम) च्या पॉलिटब्युरो आणि केंद्रीय समितीचा राजीनामा दिला होते. 2018 मध्ये राज्य सचिवालयाचे सदस्यत्व सोडले होते. त्यांच्या पश्चात पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना, असा परिवार आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “माजी मुख्यमंत्री श्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या आकस्मित निधनाने धक्का बसला आहे. मी त्यांना अनेक दशकांपासून ओळखते. आणि त्यांच्या आजारपणात काही वेळा त्यांची भेटही घेतली होती, असे त्या म्हणाल्या. तसेच भट्टाचार्य यांची पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना तसेच सीपीआय(एम) चे सदस्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल संवेदना व्यक्त केली. भट्टाचार्य शेवटच्या प्रवासात आणि त्यांच्या अंतिम संस्कारादरम्यान संपूर्ण राज्य त्यांचा आदर करेलच आणि त्यांचा सन्मानही करेल, असेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.