सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने नायगावच्या कोळीवाडा स्मशानभूमीवरील पत्रे उडाले होते. याबाबत तक्रारी करूनही प्रशासन ढिम्म होते. त्यामुळे धो धो पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली होती. याबाबत दैनिक ‘सामना’त वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जाग आलेल्या पालिकेने या स्मशानभूमीवर नवीन पत्रे बसवले आहेत. नायगाव पश्चिमेच्या भागात नायगाव कोळीवाडा परिसर आहे. या भागात असलेल्या स्मशानभूमीच्या देखभाल, दुरुस्तीकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याने या स्मशानभूमीची अत्यंत बिकट अवस्था झाली होती. त्यातच गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने स्मशानभूमीवरील पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी थेट सरणावर पडत होते. याबाबत दैनिक ‘सामना’ वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाला खडबडून जाग आली असून नवीन पत्रे बसवण्यात आले आहेत.
‘सांग काम्या हो नाम्या’ काम थांबवा
पालिकेने पत्रे बसवले असले तरी सरण ठेवण्यात येणारे लोखंडी गंजलेले खांब, मोडकळीस आलेल्या जाळ्या, विद्युत दिवे बसवलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने वृत्तपत्रातील बातमीनंतर केवळ पत्रे न बसवता बाकीची कामेदेखील युद्धपातळीवर करावीत. अधिकाऱ्यांनी ‘सांग काम्या हो नाम्या’ काम थांबवावे, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.