कोल्हार भगवतीपूर मध्ये विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडासह अवघा 10 मिनिटे वळवाचा पाऊस झाला. मात्र सोसाट्याच्या वारा व वादळाने मोठमोठे वृक्ष उन्मळून रस्त्यावर आडवे झाले तर अनेक पत्र्याच्या शेडवरील पत्रे दूरवर उडून पडल्याने पहिल्याच पावसाने कमी पण वादळाच्या तदाखताने जास्त दाणादाण उडविली.
सायंकाळी पाच नंतर अचानक आभाळ झाकोळले आणि काही मिनिटेच सोसाट्याच्या वाऱ्याने कहर केला. कोल्हार लोणी रस्त्यावरील अनेक रसवंती गृहाच्या पत्र्याचे शेड असणाऱ्या टपऱ्या या वादळाने उडून पडल्या. तर मोठमोठे वृक्ष आडवे झाले. वाड्यावस्त्यांवरील अनेक झाडे आडवी झाली. सोबत छोट्यामोठ्या टपऱ्याही वेगाने आलेल्या वाऱ्याने उडाल्या.
लोणी पोलिसांनी तातडीने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील आडवी झालेली मोठी झाडे बाजूला करीत तुंबलेली वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. पहिल्याच पावसात अनेकांचे आर्थिक नुकसान झाले तर रस्त्याच्या कडेला उभे असलेले मोठमोठे वृक्ष जमीनदोस्त झाले. अवघ्या दहा मिनिटात वादळाने खेळ केल्याने अनेकांचे नुकसान तर जुनी वृक्ष संपदा नष्ट झाली.
कोल्हार राजुरी रस्त्यावर अनेक विजेचे खांब आडवे झाल्याने गावातील विद्युतपुरवठा खंडित झाला. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पोल उभे करण्याचा प्रयत्न उशिरापर्यंत करीत होते. अचानक आलेल्या या पावसाने उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला तर हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र वादळाने जास्त नुकसान झाले.