वन विभागाचा तुघलकी निर्णय पशुपालकांच्या मुळावर; पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणे कठीण

राधानगरी तालुक्यात जंगली श्वापदांच्या हल्ल्यात एखाद्या जनावराचा मृत्यू झाल्यानंतर ते जनावर त्याच ठिकाणी 7 दिवस सीसीटीव्ही देखरेखीखाली ठेवून हल्ल्यातील श्वापद परत आल्याची खात्री करून मगच नुकसानग्रस्त पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचा नवीन नियम पशुपालकांच्या मुळावर उठला आहे. यामुळे पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणे कठीण झाले आहे.

अलीकडील काळात जंगलातील हरीण, सांबर, ससा यांसारख्या प्राण्यांची संख्या कमी झाल्यामुळे वन्य श्वापदे नागरी वस्तीत दाखल होत आहेत. श्वापदे शेळ्या-मेंढ्यांची सहज शिकार करीत आहेत. त्यामुळेच तरस, बिबट्या, लांडगे, कोल्हे यांसारख्या जंगली हिस्र श्वापदांनी उसासारख्या पिकात आपले आश्रयस्थान निर्माण केले आहे. त्यामुळे पाळीव जनावरांवर वन्य श्वापदांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये एकाचवेळी अनेक जनावरे अशा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडत असल्यामुळे पशुपालकांचे नुकसान होत आहे. वन संरक्षण कायद्यानुसार वन्य श्वापदांच्या हल्ल्यात मृत अथवा जखमी झालेल्या पशुधनाची नुकसान भरपाई देणे वन विभागावर बंधनकारक असून, अपवाद वगळता सदर नुकसान भरपाई देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून करण्यात येणारी टाळाटाळ पशुपालकांना अनुभवास मिळते. परंतु, दीर्घकाळ पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळाल्याची उदाहरणे ही आहेत.

मात्र, आता वन विभागाने लागू केलेल्या नवीन नियमामुळे मदत मिळण्याची आशा संपत आली असून, मदत सोडा मृत जनावरे पाच दिवस गावठी कुत्रे, घारी यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कुणी देखरेख करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात अथवा गावाशेजारी अशी मृत जनावरे पाच दिवस ठेवल्यानंतर गावकरी व शेतकऱ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. यामुळे पशुपालकाला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हल्ला केलेले श्वापद यादरम्यान त्याला दुसरी शिकार मिळाल्यास मृत जनावरे ठेवलेल्या ठिकाणी परत फिरकलेच नाही, तर नुकसान भरपाई रामभरोसे बनली आहे. त्यामुळे असा नियम शासनाच्या लोककल्याणकारी धोरणाला हरताळ फासणारा असून, पशुधनावर गुजराण करणाऱ्या सर्वसामान्य पशुपालकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे सदरचा नियम रद्द करण्याची आग्रही मागणी पशुपालकांकडून करण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाने याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा पशुपालकांकडून देण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

जंगली श्वापदांच्या हल्ल्यातील मृत जनावरे 7 दिवस सीसीटीव्ही देखरेखीखाली
गावाशेजारी दुर्गंधीमुळे ग्रामस्थांचा विरोध
शेतामध्ये असे जनावर पाच दिवस ठेवल्यास शेतीकामाचा खोळंबा होणार
सीसीटीव्हीमध्ये भटकी कुत्री अथवा प्राणी आल्यास वरिष्ठ कार्यालयाकडून निर्णय
मृत जनावर सांभाळणार कोण?
जंगली श्वापद न आल्यास नुकसानभरपाईचा निर्णय वरिष्ठ कार्यालयाकडे (नुकसानभरपाई नाकारण्याचा अनुभव)
गरीब पशुपालकांना मोठा आर्थिक भुर्दंड व नाहक मनस्ताप
मानवी वर्दळीमुळे मृत जनावराच्या ठिकाणी जंगली श्वापद येत नाही.

नियम रद्द करा, अन्यथा आंदोलन छेडू…

वन्य श्वापदांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जनावराकडे मानवी वर्दळ किंवा इतर कारणांमुळे तेच श्वापद परत फिरकण्याची शक्यता अत्यंत कमी असते. उलट वासामुळे भटकी कुत्री मृत जनावराकडे आकर्षित होतात. अशावेळी ट्रप कॅमेरामध्ये दिसलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे जनावर मृत्युमुखी पडल्याचे गृहीत धरून नुकसानभरपाई नाकारण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे हा नियम रद्द करावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– संजय वाघमोडे, अध्यक्ष, यशवंत क्रांती संघटना.

कॅमेरे लावून शहानिशा केली जाते

जनावर मृत्युमुखी पडलेल्या ठिकाणी नियमानुसार कॅमेरे लावून शहानिशा करण्यात येते. कॅमेऱ्यामध्ये भटकी कुत्री दिसली तरीही स्थानिक वनपरीक्षेत्र अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, शवविच्छेदन अहवाल व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे नुकसान भरपाईचा निर्णय वरिष्ठ कार्यालयाकडून घेतला जातो.
– कमलेश पाटील, सहायक वनसंरक्षक, कोल्हापूर वन विभाग.