आठ महिन्यांपूर्वी जयंती नाल्यात मनपा सफाई कर्मचाऱ्यांना डोके नसलेला मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचे गूढ उकलण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आव्हानात्मक खुनाचा उलगडा करताना, अंडरवेअरच्या कंपनीवरून नातेवाईकांचा शोध घेत अशोक पाटील (रा. पिशवी, ता. शाहूवाडी) अशी खून झालेल्या व्यक्तीची माहिती मिळविली
दरम्यान, पोलिसांनी तपास करताना आठ महिन्यांपूर्वी अशोक पाटील याची हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी रंकाळा तलाव चौपाटीवर पाठलाग करून अजय उर्फ रावण दगडू शिंदे (वय 25, रा. डवरी वसाहत, यादवनगर, कोल्हापूर) यानेच हा खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी अभिषेक मंजुनाथ माळी (वय २०), अतुल सुभाष शिंदे (वय २३, दोघे रा. डवरी वसाहत, कोल्हापूर) आणि अजय उर्फ रावण दगडू शिंदे (मयत) व इतर 4 अल्पवयीन मुलांवर राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 4 एप्रिलला जयंती नाल्यातील गाळ काढताना मनपा कर्मचाऱ्यांना डोके नसलेला पुरुष जातीचा मृतदेह आढळला होता. डोके आणि अंगावर कपडे नसल्याने पोलिसांना मृतदेहाची ओळख पटत नव्हती. शवविच्छेदन अहवालात शार्प कट असा डॉक्टरांचा अभिप्राय आल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपास करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार तपास करताना पथकाने जिल्ह्यातील सर्व मिसिंग व्यक्तींची माहिती घेऊन धडाच्या अंगावरील फक्त अंडरवेअरच्या कंपनीवरून नातेवाईकांचा शोध घेत मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आणले. पण, खून कोणी केला याबाबत काहीच माहिती नव्हती. तरीही तपास सुरूच होता. यावेळी डवरी वसाहतमधील रावण उर्फ अजय शिंदे, त्याचे दोन मेव्हणे आणि साथीदारांनी हुतात्मा पार्कमध्ये एकाचा खून करून त्याचे मुंडके कापून घड नाल्यामध्ये टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा उलगडा करत संशयितांना ताब्यात घेतले.
सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, योगेश गोसावी, प्रवीण पाटील, संतोष बरगे, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, सुशील पाटील, कृष्णात पिंगळे व नामदेव यादव यांनी ही कारवाई केली आहे.