कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या एकूण 213 जागांसाठी गेल्या 10 दिवसांत झालेल्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीत पावसामुळे अडथळा निर्माण होऊनही जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे यशस्वी पार पडली. या कालावधीत 7616पैकी सहा हजार 225 उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले आहेत. आता लेखी परीक्षेकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर जिह्यात पोलीस शिपाईपदाच्या 154 जागांसाठी सहा हजार 677, तर पोलीस शिपाई चालकपदाच्या 59 जागांसाठी चार हजार 668 असे या दोन्ही पदांसाठी एकूण 11 हजार 445 अर्ज आले होते. यांमधील 10 हजार 865 उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाने बोलाविले होते. त्यांपैकी सात हजार 606 उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर राहिले. त्यांतील एक हजार 391 उमेदवार कागदपत्र पडताळणी, तसेच उंची आणि छाती मोजमापात अपात्र ठरले.
19 ते 27 जूनपर्यंत येथील पोलीस कवायत मैदानावर पोलीसभरतीचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत राहिलेल्या उमेदवारांसाठी काल (शुक्रवारी) मैदानी चाचणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. अखेरच्या दिवशी 53 उमेदवारांनी हजेरी लावली. त्यांपैकी 44 उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली. राज्यात अजूनही काही जिह्यांत मैदानी चाचणी सुरू आहे. या सर्व जिह्यांतील मैदानी चाचणी संपल्यानंतर राज्यात एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून तारीख जाहीर झाल्यानंतर लेखी परीक्षा होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
दरम्यान, ही भरती प्रक्रिया यशस्वी आणि सुरळीतपणे पार पाडल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुखांकडून या भरती प्रक्रियेसाठी राबलेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
मैदानासाठी पोलिसांची चाचणी यशस्वी
n दुसऱया दिवशी आलेल्या पावसामुळे भरती होईल की नाही, अशी शंका वाटत असतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी रातोरात माती, तसेच बारदानाची व्यवस्था करून मैदान कोरडे करून घेतले. क्रीडा अधिकाऱयाकडून खात्री करून घेतल्यानंतर दुसऱया दिवशी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी यशस्वी केली. पोलीस भरतीच्या या 10 दिवसांच्या कालावधीत जिल्हा पोलिसांनी मैदानासाठी घेतलेली ही खबरदारी विशेष कौतुकास्पद ठरली.