मुलीचा जबाब घेताना छेडछाड; पोलीस नाईकवर गुन्हा, कोल्हापुरातील घटनेने खळबळ

जखमी अल्पवयीन मुलीचा खासगी रुग्णालयात जबाब नोंदविताना पोलीस नाईक चेतन घाटगे याने असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजताच पोलीस ठाण्यातून संशयित घाटगे पळून गेला. पोलिसांची दोन पथके त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, घाटगे याला निलंबित केल्याचा आदेश अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी दिला आहे. मात्र, पीडित महिलांचा जबाब नोंदविण्यासाठी महिला पोलीस अधिकारी व महिला पोलिसांना का पाठविले गेले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

एका अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने, तिला नागाळा पार्क येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दि. 2 एप्रिल रोजी तिचा जबाब नोंदविण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक चेतन घाटगे गेला होता.

अतिदक्षता विभागात जाऊन त्याने जबाब घेताना असभ्य वर्तन केल्याची तक्रार पीडित मुलीने पोलिसांत दिली होती. याप्रकरणी चेतन घाटगेविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलमानुसार गुन्हा दाखल झाला. घाटगेविरोधात पीडित मुलीचा जबाब नोंदविण्याचे काम सायंकाळी पूर्ण करण्यात आले. दिवसभर घाटगे शाहूपुरी पोलीस ठाण्यात ऑनड्युटी होता. आपल्यावर गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच तो पसार झाला. पोलिसांची दोन पथके त्याच्या मागावर असून, त्याच्या राहत्या घरी तसेच हातकणंगले तालुक्यातील मूळगावीही शोध घेण्यात आला. त्याच्या अटकेसाठी पथके तैनात आहेत. अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार यांनी घाटगेच्या निलंबनाचा आदेश शुक्रवारी काढला.